डोहात पोहायला गेलेल्या शाळकरी मुलीचा बुडून मृत्यू, वर्ये येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 04:03 PM2022-04-27T16:03:18+5:302022-04-27T16:03:59+5:30
त्यावेळी कस्तुरी डोहात पोहत असताना अचानक बुडाली. हा प्रकार तिच्या मैत्रिणींच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली.
सातारा : चार मैत्रिणींसमवेत वेण्णा नदीतील डोहात पोहण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय शाळकरी मुलीचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. कस्तुरी विजय निकम (वय १३, रा. वर्ये, ता, सातारा) असे बुडून मृत्यू झालेल्या शाळकरी मुलीचे नाव आहे. ही घटना काल, मंगळवारी दुपारच्या सुमारास वर्ये गावच्या हद्दीत घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, कस्तुरी निकम आणि तिच्या चार मैत्रिणी वर्येमधील वेण्णा नदीच्या निकम आळी डोहात पोहण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी कस्तुरी डोहात पोहत असताना अचानक बुडाली. हा प्रकार तिच्या मैत्रिणींच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. तसेच याठिकाणी कपडे धुणाऱ्या महिलांनीही आरडाओरड करून गावातील लोकांना बोलावून आणले.
यानंतर काही ग्रामस्थांनी डोहामध्ये उडी मारून कस्तुरीचा शोध घेतला. त्यावेळी ती डोहाच्या तळाला सापडली. तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे वर्ये परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
कस्तुरी ही सातवीमध्ये शिकत होती. हुशार विद्यार्थिनी म्हणून तीची ओळख होती. तिचे आई-वडील मोजमजुरी करतात. तिला आणखी एक मोठी बहीण आहे. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.