जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे एसटीच्या १३६ फेऱ्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:23 AM2021-07-24T04:23:23+5:302021-07-24T04:23:23+5:30
सातारा : साताऱ्यासह सांगली, कोल्हापूर, कोकणात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक मार्गांवर दरडी कोसळल्या ...
सातारा : साताऱ्यासह सांगली, कोल्हापूर, कोकणात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक मार्गांवर दरडी कोसळल्या आहेत. बहुतांश धरणे भरली असल्याने विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे नद्यांना महापूर आला आहे. याचा फटका राज्य परिवहन महामंडळाला बसला असून, गुरुवारी दिवसभरात १३६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एका दिवसात सरासरी ५ लाख २३ हजार रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे.
सातारा जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे कऱ्हाड, पाटण, महाबळेश्वर, जावळी तालुक्यातील अनेक मार्गांवर दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. पावसामुळे अनेकांनी प्रवास करणे टाळले असले तरी संभाव्य धोका ओळखून राज्य परिवहन महामंडळाने काही मार्गांवरील एसटीच्या फेऱ्या रद्द केल्या होत्या. यामध्ये गुरुवारी दिवसभरात १३६ फेऱ्यांचा समावेश होता. सर्वाधिक पाटण तालुक्यात ३९, कऱ्हाड तालुक्यात २५ फेऱ्यांचा समावेश आहे.
चौकट
पुराच्या पाण्यात एसटी न नेण्याच्या सूचना
जिल्ह्यातील बहुतांश मार्गांवर दरडी कोसळल्या असून, पुलावरून पाणी वाहत आहे. यामुळे अनेक मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. पुलावरून पाणी वाहत असताना एसटी पाण्यात नेऊ नये, अशा वेळी जवळच्या ग्रामपंचायतीत किंवा आगारात एसटी थांबवावी, अशा सूचना विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी सर्व चालक-वाहकांना केल्या आहेत.
आगारनिहाय गुरुवारी रद्द फेऱ्या
पाटण : ३९
कऱ्हाड : २५
वाई : १६
सातारा : १४
फलटण : १३
महाबळेश्वर : १३
मेढा : ८
दहीवडी : ५
पारगाव खंडाळा : ३
कोरेगाव : ०
वडूज : ०