उदयनराजे गटाच्या १४ संचालकांचे राजीनामे
By Admin | Published: November 17, 2016 11:18 PM2016-11-17T23:18:12+5:302016-11-17T23:18:12+5:30
अजित पवारांमुळे वाताहत : बाजार समिती, खरेदी-विक्री संघांत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा उदयनराजेंचा आरोप
सातारा : पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा बाजार समिती, तालुका व जिल्हा खरेदी-विक्री संघातील खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थक असणाऱ्या १४ संचालकांनी गुरुवारी आपले राजीनामे दिले. या संस्थांमध्ये झालेल्या कोट्यवधींच्या भ्रष्टाचार झाल्यामुळेच माझ्या विचाराच्या संचालकांनी राजीनामे दिल्याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अजित पवार यांच्यामुळेच राज्याची वाताहत झाल्याचा आरोप करून त्यांच्यासह इतर नेत्यांच्या भ्रष्टाचाराची फाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाबून ठेवल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला.
खा. उदयनराजे म्हणाले, ‘माझ्या विरोधात आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. वास्तविक २५ वर्षांपासून मीच सांगत आलोय की, भ्रष्टाचार खपवून घेणार नाही. माझा स्वत:चा भाऊ जरी असला तरी मी तत्त्वाशी बांधील असल्याने मी समाजाशिवाय दुसरा विचारच करत नाही. सातारा बाजार समितीमधील भ्रष्टाचाराबाबत तक्रार केल्यानंतर सहकार विभागाने याची चौकशी केली. बाजार समितीत कोट्यवधीचा भ्रष्टाचार झाल्याचा अहवाल चौकशी अधिकाऱ्यांनी दिला आहे. या अधिकाऱ्यांनी बँकेचे तत्कालीन सभापती राजू भोसले, सतीश चव्हाण, किरण साबळे-पाटील, व्यापारी संजय झंवर यांना वसुलीच्या नोटिसा पाठविल्या आहेत. या सर्वांनी निविदा न काढता बाजार समितीची जागा २८ वर्षांच्या करारावर देऊन टाकली आहे. आता सहकार विभागाने बाजार समितीवर प्रशासक नेमून संचालक मंडळाच्या खासगी मालमत्तेवर जप्ती आणावी, अशी मागणी मी केली आहे.’
ज्यांना ही नोटीस बजावली आहे, ते सर्वजण आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जवळचे आहेत. या भ्रष्टाचाराची माहिती जर त्यांना नसेल तर मोठा विनोद होईल, अशी टीकाही खासदार उदयनराजेंनी यावेळी केली. (प्रतिनिधी)
... तर आम्ही वाटून खाल्ले असते
‘तालुका, जिल्हा खरेदी-विक्री संघात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत चौकशीची मागणी आपण करणार आहे. या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे आपल्याकडे असून, मी ती चौकशी अधिकाऱ्यांना सादर करेन. माझ्यावर आरोप करणाऱ्या शिवेंद्रसिंहराजेंनी ध्यानात घ्यावे की मला टक्केवारीच खायची असती तर तुमच्याशी मिळते जुळते घेऊन वाटून खाल्ले असते,’ असे वक्तव्येही खासदार उदयनराजे भोसले यांनी यावेळी दिला.