जिल्ह्यातील १४ मदरशांचे होणार सर्वेक्षण

By admin | Published: July 2, 2015 11:40 PM2015-07-02T23:40:50+5:302015-07-02T23:40:50+5:30

समाजबांधवांची प्रतिक्रिया : मुस्लिमांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

14 madrassa survey conducted in the district | जिल्ह्यातील १४ मदरशांचे होणार सर्वेक्षण

जिल्ह्यातील १४ मदरशांचे होणार सर्वेक्षण

Next

सातारा : धार्मिक शिक्षण घेणाऱ्या मुस्लीम समाजातील मुलांना त्यांच्या हक्कांपासून तसेच शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे राज्य सरकारमधील अधिकारी सातत्याने प्रयत्न करीत असून, मदरशांमधील मुलांना आता शाळाबाह्य ठरविणे, हा त्याचाच एक भाग असल्याची संतप्त प्रतिक्रिया मुस्लीम समाजातून व्यक्त होत आहे. सातारा जिल्ह्यामध्ये एकूण १४ मदरसे असून, यामध्ये धार्मिक शिक्षण दिले जाते.
मदरसा बंद पडले तर समाजातील धार्मिक विधी कोण करणार? असा सवालही उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात कोणती भूमिका घ्यावी, याबाबत १६ जुलैला चाँद कमिटीच्या बैठकीत ठरविले जाईल, असेही सांगण्यात आले.
शिक्षणाचा हक्क प्राप्त करून देण्यासाठी ज्या गोष्टी सरकारला जमत नाहीत, त्या गोष्टी मदरशांमधून सुरू केल्या आहेत. याबाबत मोळाचा ओढा येथील मदरसेचे संचालक मौलाना जमीर साहब यांनी सांगितले की, ‘मुस्लीम समाजातील केवळ एक टक्का मुले मदरशांमध्ये शिक्षण घेतात. त्यातही अनाथ, गरीब मुलांचा समावेश असतो. अन्य मुले ही खुल्या शाळेतूनच शिक्षण घेतात. लग्नाचे विधी, नमाज पठण, इस्लामचे तत्त्वज्ञान हे खुल्या शाळेत शिकविले जात नाहीत. ते शिक्षण मदरशांमध्ये दिले जाते. मदरशांमध्ये शिकवलेले शिक्षण आणि शाळेमध्ये देण्यात येणारे शिक्षण या दोन्हीही बाजूला मान्यता दिली तर आम्हाला काही हरकत नाही. (प्रतिनिधी)


मदरशांना वक्फ बोर्डाची मान्यता!
सातारा जिल्ह्यात असे धार्मिक शिक्षण देणारे सुमारे १४ मदरसे असून, सुमारे पाचशे मुस्लीम विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. ‘गुरूकुल’च्या धर्तीवर असलेल्या या मदरशांमध्ये मौलवी अर्थात ‘धर्मगुरू’ होण्यासाठी सात वर्षे शिक्षण घ्यावे लागते. मदरशांना वक्फ मंडळाची मान्यता घेतली जाते. राज्य सरकारची वेगळी परवानगी घेतली जात नाही.
सध्या सातारा येथे ३, कऱ्हाड ९, महाबळेश्वर २, असे १४ मदरसे जिल्ह्यात आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे दि. ४ जुलै रोजी जिल्ह्यात असे मदरशातील शालाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण होणार आहे. त्यांना नियमित शाळेत सामावून घेतले जाणार आहे.
- प्रवीण अहिरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी

Web Title: 14 madrassa survey conducted in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.