जिल्हा परिषदेचे १४ हजार कर्मचारी संपावर; कामकाजावर होणार परिणाम
By नितीन काळेल | Published: March 13, 2023 08:22 PM2023-03-13T20:22:05+5:302023-03-13T20:22:16+5:30
याबाबत जिल्हा परिषदेतील विविध कर्मचारी संघटनांच्या वतीने माहिती देण्यात आली.
सातारा : ‘आता एकच मिशन, जुनी पेन्शन’ अशी घोषणा देत जिल्हा परिषदे अंतर्गत येणारे सुमारे १४ हजार वर्ग तीन आणि चारचे कर्मचारी मंगळवारपासून बेमुदत संपात सहभागी होत आहेत. यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीसह गावपातळीवरील कामकाजावरही परिणाम होणार आहे. तर मंगळवारीच साताऱ्यात मोर्चाचे नियोजन केले आहे.
याबाबत जिल्हा परिषदेतील विविध कर्मचारी संघटनांच्या वतीने माहिती देण्यात आली. त्यानुसार २००५ च्या नोव्हेंबर महिन्यानंतर राज्यातील वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली. या योजनेसाठी कर्मचारी संघटनांच्या वतीने वारंवार आंदोलने करण्यात आली. मात्र, त्यांच्या पदरी काहीच पडले नाही. तेसच वेतानातीनल त्रटीचाही मुद्दा कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे. अशा विविध मागण्यांसाठी दि. १४ मार्चपासून ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ अशी घोषणा देत कर्मचारी संपात सहभागी होत आहेत.
सातारा जिल्हा परिषदे अंतर्गत वर्ग तीन आणि चारचे सुमारे १४ हजारांहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, शाळांत हे कर्मचारी आहेत. हे सर्वजण मंगळवारपासून संपात सहभागी होत आहेत. यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीतील कामकाज बंद राहणार आहे. या आंदोलनात जिल्हा परिषदेकडील शिक्षक, लिपिक, अधीक्षक, ग्रामसेवक, शाखा अभियंता, शिपाई, नर्सेस, विस्तार अधिकारी, पर्यवेक्षक, आरोग्य सेवक आदी सहभागी होणार आहेत.
कार्यालयात आता अधिकारीच...
जुनी पेन्शन या प्रमुख मागणीसाठी मंगळवारपासून कर्मचारी संपावर जात आहेत. पण, अधिकारी कामावर हजर असणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीत अधिकारीच दिसतील. तर या संपात जिल्हा परिषदे अंतर्गत शिक्षकांची संख्या सर्वाधिक आहे.
जुनी पेन्शन योजनेची कर्मचाऱ्यांची मागणी आहे. ही योजना देशातील त्रिपुरा, हरियाना, राजस्थानसह चार राज्यात लागू करण्यात आली. पण, महाराष्ट्रात याची दखल घेण्यात आलेली नाही. यामुळे कर्मचाऱ्यांत असंतोषाचे वातावरण आहे. मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही.- काका पाटील, अध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ