हक्काच्या पाण्यासाठी १४० गावचे शेतकरी आक्रमक
By admin | Published: April 19, 2017 02:59 PM2017-04-19T14:59:33+5:302017-04-19T14:59:33+5:30
रास्ता रोकोचा इशारा : जिल्ह्याचे पाणी जिल्ह्यातील शेतीलाच सोडण्याची मागणी
आॅनलाईन लोकमत
मसूर(जि. सातारा) , दि. १९ : सातारा, कोरेगाव व कऱ्हाड तालुक्याचे हक्काचे आरफळचे पाणी सांगलीला पळवले जात आहे. त्यामुळे या तीन तालुक्यातील पिके वाळू लागलेली आहेत. आरफळ कॅनॉलमधील कन्हेर धरणातील हक्काचे रोटेशनचे पाणी तातडीने सातारा जिल्ह्यातील पिकांना सोडावे, अन्यथा सातारा येथील मुख्यालयाचे कार्यकारी अभियंता यांच्या दालनासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन व रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा सातारा, कऱ्हाड, कोरेगांव तालुक्यातील १४० गावातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्यावतीने प्रशासनास देण्यात आला आहे.
याबाबतची निवेदने संबंधीत विभागातील अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्यावतीने पाठविण्यात आली आहेत. शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाटबंधारे विभाग आरफळ डावा कालवा हा कण्हेर धरणापासून करवडीपर्यंत, सातारा व कऱ्हाड तालुक्यातील सुमारे १४० गावापर्यंत जातो. या कालव्याच्या कार्यक्षेत्रात सुमारे २५ ते ३० हजार क्षेत्र प्रवाही सिंचनाने भिजत आहे.
उन्हाळयाच्या दिवसात दर पंधरा दिवसाने पाण्याचे अवर्तन कालव्यामधून सोडण्याकरीता उन्हाळी हंगामाचे जाहीर प्रकटन धोम पाटबंधारे सातारा विभाग यांनी काढलेले आहे. त्यात २५ मार्च २०१७ रोजी कालव्याला पाणी सोडण्याचे असताना ४ फेब्रुवारी २०१७ पासून अखंडपणे केवळ सांगलीकरीता व उरमोडी करीता पाणी सुरू असल्याने सुमारे ४० दिवस उलटून सुद्धा आजअखेर सातारा, कोरेगांव व कऱ्हाड तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळाले नाही. सदर सातारचे पाणी सांगलीला जाण्याचेच फक्त पहावे लागत असल्याची दुदैर्वी वेळ शेतकऱ्यांच्यावर आली आहे.
अधिकाऱ्यांनी आरफळ कॅनॉलमधील कण्हेर धरणातील पाणी रोटेशन नुसार सोडण्यास टाळाटाळ केल्यास तसेच उन्हाळी हंगामाचे दिनांक २४ एप्रिल ते ३ मे व २५ मे ते ३१ मे पर्यंतचे रितसर अवर्तने जाहीर केल्याप्रमाणे जाहीर प्रकटनानुसार पाणी न सोडल्यास होणाऱ्या गंभीर परिणामांना संबंधीत अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा निवेदनात दिला आहे. आंदोलनाबाबतची निवेदने उपकार्यकारी अभियंता लवटे, सहाय्यक अभियंता नांगरे व धोमपाटबंधाऱ्यांचे कार्यकारी अभियंता यांना देण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)
बागायती पिकांची नुकसान
पाण्याअभावी आरफळ कॅनॉल अंतर्गत असणारी क्षेत्रे माळरानातील व बागायती पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे हक्काचे अवर्तन असूनही स्वत:ची पिके वाळत चालली असल्याचे विदारक चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. अशी वस्तूस्थिती असतानाही पाणी नियोजन करणाऱ्या बेफिकीर संबंधीत अधिकाऱ्यांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. सांगली जिल्हा अशाच पद्धतीने आपल्या जिल्ह्यातील पाणी पळवत असून आपल्या हक्काचे पाणी आपल्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळत नसेल तर यासारखे दुर्दैव नाही