सातारा जिल्ह्यात १.४९ लाख लोक तहानले

By admin | Published: August 29, 2014 09:18 PM2014-08-29T21:18:56+5:302014-08-29T23:13:12+5:30

जिल्ह्यात ६७ टँकरने पाणीपुरवठा : ३५४ गावांत भीषण परिस्थितीे

1.49 lakh people thundered in Satara district | सातारा जिल्ह्यात १.४९ लाख लोक तहानले

सातारा जिल्ह्यात १.४९ लाख लोक तहानले

Next

सातारा : जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार सरी कोसळत असताना दुष्काळी भागात मात्र टँकर फेऱ्या सुरुच आहेत. दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता जिल्हा प्रशासनही सज्ज झाले असून अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यात आजमितीस ६७ टँकरने ३५४ गावे आणि वाडीवस्तींवर पाणीपुरवठा सुरू आहे. यामध्ये ८७ गावे आणि २६७ वाड्यांचा समावेश असून तहानलेल्या लोकांची संख्या १ लाख ४९ हजार ७५ इतकी असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली.
जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यांत जोरदार सरी कोसळल्या आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वीची परिस्थिती लक्षात घेता अनेक ठिकाणी दुबार पेरणी करावी लागेल, असे चित्र होते. मात्र, धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार सरी कोसळत असल्यामुळे धरणातील पाणीसाठा वेगाने वाढला. त्यातच काही धरणातून नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे अनेक ठिकाणची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली होती.
जिल्ह्यात गतवर्षी भयावह दुष्काळ होता, मात्र पाणलोट तसेच सिमेंट बंधाऱ्यांची कामे झाल्यामुळे खास करून दुष्काळी भागात पाणीटंचाई कमी प्रमाणात जाणवत होती. दुष्काळी माण आणि खटाव तालुक्यात पाणलोटची कामे चांगली झाल्यामुळे दुष्काळी गावांत पिण्याच्या पाण्याची समस्या अजून उद्भवलेली नाही. काही ठिकाणी मात्र भयावह परिस्थिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माहितीनुसार माण तालुक्यात १९ गावे व १७0 वाड्यातील ४१ हजार ५७९ लोकांना २४ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.
खटाव तालुक्यात २२ टँकरने ३५ गावातील ४६ हजार २६७ लोकांना पाणीपुरवठा सुरू आहे. कोरेगाव तालुक्यात ६ टँकरने १७ गावातील ३१ हजार ३७0 लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. फलटण तालुक्यात १४ टँकरने १५ गावे व ९७ वाड्यातील २६ हजार ९१0 लोकांना तर वाई तालुक्यात १ टँकरने १ गावातील २ हजार ९४९ लोकांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

विहिरींचे अधिग्रहण
जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची समस्या उदभवू नये म्हणून पिण्याचे पाणी राखून ठेवण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने जिल्ह्यात ६१ विहीरीचे अधिग्रहण केले आहे. यामध्ये माण तालुक्यातील २४, खटाव २६, कोरेगाव २, खंडाळा ४, फलटण ३, वाई १ आणि कऱ्हाड तालुक्यातील १ विहीरीचा समावेश आहे.

Web Title: 1.49 lakh people thundered in Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.