नरेंद्र दाभोलकर यांची पुस्तके करणार ‘घरोघरी विचाराचा जागर’, पंधरा पुस्तकांचे आज प्रकाशन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 12:06 PM2024-08-20T12:06:01+5:302024-08-20T12:06:14+5:30
मुलांच्या सोयीसाठी संक्षिप्त स्वरूपात लेखन
जगदीश कोष्टी
सातारा : समाजाला विवेकाच्या मार्गावरून घेऊन जाण्यासाठी, त्यांच्यातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आयुष्यभर लढा उभारला. केवळ रस्त्यावर उतरून परिवर्तन घडणार नाही, हे ओळखून त्यांनी पुस्तके लिहिली होती. त्यांच्या विचारातून प्रेरणा घेऊन असंख्य तरुण चळवळीशी जोडले गेले. मृत्यूनंतरही नरेंद्र दाभोलकर यांचे विचार घरोघरी पोहोचविण्याचा संकल्प ‘अंनिस’ने केला आहे. यातून नवी पिढी घडणार आहे.
अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे. समाजातील अज्ञान, निरक्षरतेचा गैरफायदा घेऊन काही भोंदू फसवत असतात. हातचलाखी करून चमत्कार घडवत अन् लोकांचा विश्वास संपादन करत होते. त्यातून फसवणुकीची साखळी वाढतच होती. अनेकदा हे प्रकार नरबळीपर्यंत जाऊन पोहोचत असत. समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आयुष्यभर लढा दिला. जादूटोणाविरोधी कायदा करण्यासाठी विविध पातळ्यांवर पाठपुरावा केला.
प्रवाहाच्या विरोधात जाऊन लढा सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला विवेकाच्या मार्गावरून नव्या पिढीला घेऊन जाण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्यभर शाखा सुरू केल्या. एवढ्यावर न थांबता बाराहून अधिक पुस्तके त्यांनी लिहिली. त्यातून विवेकाचा जागर सुरू झाला. त्यांच्या विचारातून हजारो कार्यकर्ते घडले. ते आपापल्या क्षेत्रात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ‘अंनिस’चे काम करत आहेत. प्रवाहाच्या विरोधात जाऊन काम करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या विचारांचा सामना विचारांनी करू न शकणाऱ्या प्रवृत्तींनी २० ऑगस्ट २०१३ रोजी त्यांची हत्या केली; पण दाभोलकर यांच्या मृत्यूनंतरही त्यांचे विचार नवी पिढी घडवत आहे. त्यातूनच डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांवर आधारित पंधरा पुस्तकांचा संच तयार करण्यात आला आहे. याचे प्रकाशन स्मृतिदिनानिमित्त मंगळवार, दि. २० रोजी साताऱ्यात करण्यात येणार आहे.
ही आहेत पुस्तके..
भुताने झपाटणे
अंगात येणे
अंधश्रद्धांचे मायाजाल
बुवाबाजीचे घातक जाळे
ग्रेट भेट- डॉ. नरेंद्र दाभोलकर
विवेक जागराचा वाद-संवाद
भ्रामक वास्तू (श्रद्धा) शास्त्र
श्रद्धा अंधश्रद्धा, वाद-प्रतिवाद
लढा शनिशिंगणापूरचा
खेळाचे मानसशास्त्र
माझा न संपणारा प्रवास
सत्यशोधक विवाह
विवेकसाथी नरेंद्र दाभोलकर
नवसाच्या पशुहत्येचा गळफास
आम्हीच खरे ब्राह्मण्यविरोधक
बाल मानसशास्त्राचा विचार
डॉ. नरेंद्र दाभोलकरांची असंख्य पुस्तके ही मोठ्या स्वरूपात होती. लहान मुलांना वाचायला ती मोठी होती. बाल मानसशास्त्रांचा हाच विचार करून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रत्येक विषयावर संक्षिप्त स्वरूपात पुस्तके तयार केली. एक वर्षापूर्वी बारा पुस्तकांचा संच काढला होता. त्यातील लाखो पुस्तकांची विक्री झाली. यात आता वाढ करून पंधरा पुस्तकांचा संच तयार केला आहे. त्यांना प्रकाशनपूर्वीच चांगला प्रतिसाद मिळत असून, पैशांसह नोंदणी झाली आहे.