सांगलीतील हळद व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 06:29 PM2022-08-24T18:29:48+5:302022-08-24T18:30:32+5:30
सातारा पोलीस प्रत्येक वेळी सांगलीला जातात आणि चाैकशी करून परत येतात.
सातारा : सांगलीतील हळद व्यापाऱ्याने ४० शेतकऱ्यांना लाखो रुपयांना गंडा घातल्याचे समोर आल्यानंतर आता वाई तालुक्यातील खानापूर येथील १५ शेतकऱ्यांची तब्बल २० लाखांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात संबंधित व्यापारी आणि त्याच्या पत्नीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकुमार रमेशचंद्र सारडा, उर्मिला राजकुमार सारडा (रा. महावीरनगर, जुना बुधगाव रोड, वखारबाग, सांगली) असे गुन्हा दाखल झालेला व्यापारी आणि त्याच्या पत्नीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सांगलीतील हळद व्यापारी राजकुमार सारडा याने सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून हळद खरेदी करून सांगलीमध्ये विकली. मात्र, अनेक शेतकऱ्यांना त्याने याचे पैसे दिले नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून पैसे मिळण्यासाठी शेतकरी त्याच्या सांगलीतील घरी जात आहेत. मात्र, तो गायब असल्याचे समोर आले. त्यानंतर शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सुरुवात केली आहे.
वाई तालुक्यातील खानापूर या गावातील १५ शेतकऱ्यांची त्याने २० लाखांची फसवणूक केली आहे. त्याच्या या कामाला पत्नीचा पाठिंबा असल्याने तिच्याविरोधातही शेतकऱ्यांनी तक्रार दिली आहे. सर्व शेतकऱ्यांच्या वतीने रितेश राजाराम काळोखे (वय ३७, रा. खानापूर, ता. वाई, जि. सातारा) या शेतकऱ्याने वाई पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सारडा दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे.
‘त्याला’ अटक का होत नाही?
सातारा, वाई आणि कोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना लाखो रुपयांना गंडा घालून पसार झालेला सांगलीचा हळद व्यापारी राजकुमार सारडा हा पोलिसांना का सापडत नाही? सातारा पोलीस प्रत्येक वेळी सांगलीला जातात आणि चाैकशी करून परत येतात. परंतु त्याला पकडण्यासाठी वरिष्ठ पातळीवर स्वतंत्र पथक स्थापन करणे गरजेचे असल्याचे शेतकरी सांगत आहेत.