नोकरीच्या आमिषाने १५ युवतींची फसवणूक
By admin | Published: August 28, 2016 12:02 AM2016-08-28T00:02:25+5:302016-08-28T00:02:25+5:30
युवकाला अटक : मार्केटिंग पदावर काम देण्याचे सांगितले होते
सातारा : मार्केटिंग पदावर नोकरी देतो, असे आमिष दाखवून १५ उच्चशिक्षित युवतींकडून पैसे घेऊन फसवणूक केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका युवकाला अटक केली. नीलेश मारुती गायकवाड (रा. पीराचीवाडी, ता. वाई) असे त्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नीलेश गायकवाड याने एका वृत्तपत्रामध्ये नोकरीची जाहिरात दिली होती. ही जाहिरात वाचून बऱ्याच मुलींनी त्याच्याकडे नोकरीसाठी अर्ज केला. यावेळी त्याने काही मुलींकडून ७०० तर काही मुलींकडून २००० हजार रुपये घेतले. काही दिवसांतच ‘तुम्हाला नोकरी लावतो, मार्केटिंगसाठी कोणते प्रोडक्ट आहे, याची माहिती दिली जाईल,’ असे त्याने संबंधित मुलींना सांगितले होते. मात्र, खूप दिवस झाले तरी नोकरी लागली नाही. त्यामुळे मुलींना त्याची शंका आली. त्याच्याकडे सर्व मुलींनी कागदपत्र आणि कंपनीची मान्यता आहे का, याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली. मात्र, त्याच्याकडे यातील काहीच नसल्याचे सर्व मुलींना समजले. त्यानंतर इतर मुलांची मदत घेऊन मुलींनी त्याला पकडून शहर पोलिस ठाण्यात आणले. या ठिकाणी पोलिसांनी शहानिशा केल्यानंतर नीलेश गायकवाडने सुरू केलेली कंपनी बोगस असून, त्याने सर्व मुलींकडून ३२ हजार रुपये घेतल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला अटक केली. (प्रतिनिधी)