Satara: सणबूरमध्ये कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला; १५ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 12:24 PM2024-04-23T12:24:01+5:302024-04-23T12:24:09+5:30
नागरिकांची पळापळ : जखमींवर ढेबेवाडीतील ग्रामीण रुग्णालयात उपचार
पाटण (जि. सातारा) : येथील कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाच्या मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात कुस्ती मैदानातील पैलवानांसह १५ जण जखमी झाले, तर कुस्त्या पाहायला आलेल्या अनेकजणांना चावा घेतल्याने जखमी झाले. जखमींना ढेबेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सणबूर (ता. पाटण) येथील ग्रामदैवत श्री विठ्ठलाई देवीच्या यात्रेनिमित्त रविवार सायंकाळी आयोजित कुस्तीच्या मैदानावर आग्या मोहोळाच्या मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले. जखमींमध्ये पैलवानांसह, कुस्त्या पाहण्यास आलेले शौकीन तसेच यात्रेला आलेल्या महिला, लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे मैदान रद्द करून जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले.
यात्रेनिमित्त मुंबईकर मोठ्या संख्येने गावी आले आहेत. रविवारी सायंकाळी यात्रेनिमित्त शेतात कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते. ५१ हजारांपासून ७५ हजार रुपयांपर्यंत बक्षिसे ठेवून काही मल्लांच्या लढतीही निश्चित केल्या होत्या. मैदान सुरू झाल्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जवळच्याच झाडावर असलेल्या आग्या मोहोळाच्या पोळ्यातील मधमाश्या सैरभैर झाल्या आणि त्यांनी तेथे जमलेल्या लोकांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी बचावासाठी लोकांची पळापळ सुरू झाली.
अनेकांच्या डोक्याला तसेच हातापायांना मधमाश्यांनी चावा घेतला. त्यामध्ये पैलवानासह यात्रेत आलेल्या महिला व बालकांचाही समावेश आहे. स्थानिक खासगी दवाखाने तसेच येथील ग्रामीण रुग्णालयात जखमींना दाखल करून उपचार करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. काहीजणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले, तर काहींना ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले होते. या घटनेनंतर मैदान रद्द करण्यात आले आहे.
यात्रेच्या रंगाचा बेरंग
सणबूर येथील विठ्ठलाई देवीच्या यात्रेनिमित्त परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यात्रेनिमित्त करमणुकीचे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. मात्र, या घटनेमुळे यात्रेच्या रंगाचा बेरंग झाला. आग्या मोहोळाच्या माश्यांनी जखमी केलेल्यांना रात्री त्यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. आर. बी. यादव यांनी दिली.
कुंभारगावातही हल्ला..
विभागातील कुंभारगाव येथील श्री लक्ष्मीदेवी मंदिराच्या परिसरात रविवारी सायंकाळी आग्या मोहोळाच्या मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले. तेथे डीजेच्या दणक्याने मधमाश्यांचे पोळे तुटून खाली पडले आणि त्यामुळे चवताळलेल्या मधमाश्यांनी त्या परिसरात उपस्थित अनेकांचा चावा घेतल्याचे सांगण्यात येत आहे, तर जखमींनी रुग्णालयात उपचार घेतल्याचेही नागरिकांनी सांगितले.