राज्यातील १५ टीमएमसी पाणी रुतून बसलेय धरणांमधील गाळात, साताऱ्यात 'गाळमुक्त धरण'ची कामे युद्धपातळीवर सुरू
By दीपक देशमुख | Published: March 13, 2024 01:40 PM2024-03-13T13:40:45+5:302024-03-13T13:41:13+5:30
दोन महिन्यांत ५८ लाख घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट
दीपक देशमुख
सातारा : यंदा तीव्र दुष्काळी परिस्थिती असून गाळामुळे धरणांची साठवण क्षमताही कमी झाली आहे. राज्यातील विविध जलसाठ्यांमध्ये ४४ कोटी घनमीटर गाळ साचला आहे. यामुळे १५.५४ टी.एम.सी.ने साठवण क्षमता कमी झाली आहे. जिल्ह्याच्या विविध धरणांतही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे आगामी दोन महिन्यांत मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने युद्धपातळीवर गाळ काढण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी २३.५० कोटींच्या विविध ७५ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. हा गाळ काढल्यानंतर पाणीसाठ्यात वाढ होणार आहे.
राज्याप्रमाणे सातारा जिल्ह्यांतील धरणांतही मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. परंतु, कोयना व कण्हेर धरणवगळता इतर धरणांचे गाळ सर्वेक्षण झालेले नाही. कोयना धरणातील गाळाचे सर्वेक्षण २०२१ मध्ये झाले हाते. मात्र, धरणातील गाळ काढण्यात आलेला नाही. त्यातच पाटण तालुक्यात भूस्खलनामुळेही धरणातील गाळाचे प्रमाण वाढतच आहे. पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसामुळे धरण लगेच भरत असल्याने धरणांची मूळ साठवण क्षमता पुन्हा स्थापित करणे अत्यंत आवश्यक आहे. त्याच दृष्टीने जिल्ह्यात मृद व जलसंधारण विभागाने युद्धपातळीवर माेहीम हाती घेतली आहे.
त्यानुसार जिल्ह्यात धरण, तलाव, पाझर तलाव, बंधारे अशा जलसाठ्यांतील गाळ काढण्याच्या ७५ कामांना प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या कामासाठी २३ कोटी ५० लाख २५ हजार ७९२ इतका खर्च येणार आहे. कोयना धरणातील संपूर्ण गाळ काढल्यास साठवण क्षमता किमान १० टीएमसीनने साठवण क्षमता वाढू शकते. परंतु, त्यासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रणा राबवावी लागणार आहे.
कोयना धरणात १३ ठिकाणी गाळ काढण्यास मंजुरी
- कोयना धरणातील दरे तांब, बामणोली, दाभे, देवळी, झांजवड, दरे तांब भाग २, वाघळी, तेटली, मजरे शेंबडी, शेंबडी, मुनावळे, रामेघर, सावरी अशा तेरा ठिकाणी गाळ काढण्याच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.
- त्याचप्रमाणे राजेवाडी मध्यम प्रकल्प, धुमाळवाडी, राणंद, नेर, पिंगळी, वाखरी, ढवळ, विंचुर्णी, जाशी, बाणगंगा, मांडवे, चाळकेवाडी यासह अनेक गावांतील तलाव, पाझर तलाव व बंधाऱ्यातील गाळ काढण्यात येणार आहे.
- जलसंपदा, मृद व जलसंधारण, जिल्हा परिषदेचा लघु पाटबंधारे विभाग यांच्या अखत्यारीत सर्व जलसाठे असून जलसंपदा विभागातील प्रकल्पातूनच सर्वाधिक गाळ काढण्याची कामे होत आहेत.
- स्थानिक शेतकऱ्यांचाही सहभाग या योजनेत घेण्यात येणार असून गाळ नेण्यासाठी अनुदान देण्यात येणार आहे.
दोन महिन्यांत ५८ लाख घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट
येत्या दोन ते अडीच महिन्यांत या ७५ कामांतून ५८ लाख ७ हजार १२९ घनमीटर गाळ काढण्यात येणार आहे. तथापि, कोयना धरणातील गाळ काढण्याच्या कामांना आणखी जास्त अवधीची आवश्यकता भासू शकते.