वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्ह्यातून १५० बसेसची वारी!
By admin | Published: July 28, 2015 11:23 PM2015-07-28T23:23:37+5:302015-07-28T23:23:37+5:30
एसटीची बांधिलकी : अष्ठमीपासून अहोरात्र पुरविली जाते भाविकांना सुविधा
सातारा : ‘पाउले चालती पंढरीची वाट...’ म्हणत राज्याच्या विविध जिल्ह्यांतून वैष्णवांच्या भागवत पताका घेऊन ‘ज्ञानोबा माउली तुकाराम... विठोबा रखुमाई...’ च्या जयघोषात दिंड्या पंढरपूरला दाखल होत असल्या तरी वारकऱ्यांच्या सेवेत एसटीने कोणतीही कसूर सोडलेली नाही. सोमवार व मंगळवारी दोन्ही दिवस १५० गाड्यांनी फेऱ्या केल्या आहेत.
राज्य परिवहन महामंडळाची एसटी सर्वसामान्यांची लाडकी आहे. त्यामुळे तिला ‘गरीबरथ’ म्हणूनही ओळखला जातो. एसटी आणि गरिबांचं जसं नातं आहे, त्याचप्रमाणे वारीमध्ये सहभागी होणारेही सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर कष्टकरी वर्ग आहे. वारीत सहभागी होणारे वारकरी प्रत्येक व्यक्तीमध्ये भगवंताला शोधत असतात. त्यामुळेच प्रत्येक वारकऱ्याची सेवा केली जाते.
विठोबाच्या दर्शनाला निघालेल्या वयोवृद्ध वारकऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा विभागाने कंबर कसली आहे. सातारा विभागातील अकरा आगारांतून जादा गाड्या सोडल्या होत्या. विभाग नियंत्रण धनाजी थोरात यांनी महिना भरापासून पूर्व तयारी केली होती.
सर्व दिंड्यांनी प्रस्थान केल्यानंतर तीन-चार दिवसांनी हे आॅपरेशन सुरू झाले. यामध्ये नवमी शनिवार, दि. २५ रोजी नवमीला ६८ गाड्या, दशमी रविवार, दि. २६ रोजी ६९, एकादशी सोमवार, दि. २७ रोजी १४८ तर बारस मंगळवार, दि. २८ रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत १४७ गाड्यांनी फेऱ्या केल्या होत्या.
शनिवार ते सोमवार साताराहून पंढरपूरच्या दिशेला फेऱ्या वाढविल्या. तर एकादशीला सायंकाळनंतर सातारच्या दिशेने फेऱ्या केल्या आहेत. जे वारकरी दिंड्यांतून पंढरपूरला जात असतात ते विठोबाचे दर्शन घेऊन गावाकडे एसटीतून जात असतात. त्यामुळे आणखी काही दिवस गर्दी अशीच कायम राहील, अशी शक्यता विभाग नियंत्रक धनाजी थोरात यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. (प्रतिनिधी)
पुणे प्रादेशिक विभागाचे
नेतृत्व साताऱ्याकडे
पंढरपूरला राज्याच्या सर्वच विभागातून जादा गाड्या सोडल्या जातात. यामध्ये पुणे प्रादेशिक विभागांतर्गत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांतूनही जादा गाड्या सोडल्या आहेत. प्रादेशिक विभागाचे नेतृत्त्व करण्याचा मान साताऱ्याला मिळाला आहे. साताऱ्याचे विभागीय वाहतूक अधीक्षक के. टी. पाटील हे नेतृत्त्व करत आहेत. तर सातारा विभागाची जबाबदारी एटीएस एस. एन. ननावरे यांच्याकडे आली आहे.