दुसऱ्या लाटेत व्हेंटिलेटरवरील ४०० पैकी १५३ जणांचा मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:28 AM2021-05-31T04:28:43+5:302021-05-31T04:28:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा: शहरांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांना हिरावून नेले. बऱ्याच जणांचा राहत्या घरात तर काही जणांचा रुग्णालयात ...

153 out of 400 die on ventilator in second wave! | दुसऱ्या लाटेत व्हेंटिलेटरवरील ४०० पैकी १५३ जणांचा मृत्यू!

दुसऱ्या लाटेत व्हेंटिलेटरवरील ४०० पैकी १५३ जणांचा मृत्यू!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा: शहरांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अनेकांना हिरावून नेले. बऱ्याच जणांचा राहत्या घरात तर काही जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये व्हेंटिलेटरवर असणाऱ्या ४०० रुग्णांपैकी १५३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे समोर येत आहे.

जिल्ह्यात गतवर्षी कोरोनाची रुग्ण संख्या फारशी नव्हती. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तब्बल एका लाखाने रुग्ण संख्या वाढली. यामध्ये सातारा शहरातही रुग्णसंख्या वाढलेली पाहायला मिळत आहे. सातारा शहरांमध्ये १७ कोरोना सेंटर आहेत. मात्र तरीसुद्धा रुग्णांना वेळेत बेड उपलब्ध होत नव्हते. अशी परिस्थिती असताना बऱ्याच जणांनी घाबरून जीव सोडला. तर काहींना रुग्णालयात नेण्यात आले. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले असतानाच त्यांचाही मृत्यू झालाय. शासनाकडे अशी कोणत्या मशीनमुळे मृत्यू झाला, अशी आकडेवारी नाही. मात्र रुग्णालयातील काही डॉक्टरांशी बोलूनही आकडेवारी समोर आली आहे.

सातारा तालुक्यात आतापर्यंत २४ हजार १३२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ७४२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सातारा शहरातील ९ हजार १०० रुग्णांचा समावेश असून वर्षभरात १४७ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.

रुग्णालयात असलेल्या व्हेंटिलेटरची तसं पाहिलं तर दिवसातून पाच ते सहावेळा स्वच्छता करणे गरजेचे असते. मात्र जिल्हा शासकीय रुग्णालयात रियॅलिटी चेक केल्यानंतर केवळ दिवसातून एकदाच व्हेंटिलेटरची स्वच्छता होत असल्याचे रुग्णांनी सांगितले. हीच स्थिती कोरोना सेंटरमध्ये पाहायला मिळाली. खासगी हॉस्पिटलमध्ये ही अपवादात्मक परिस्थितीत फार तर दोन वेळा व्हेंटिलेटरची स्वच्छता करत आहेत. रुग्णांचे नातेवाईक बारकाईने लक्ष ठेवत असतात. त्यामुळेच रुग्णालयातील माहिती समोर येत आहे.

चौकट: सहा तास तासांनी व्हायला हवी स्वच्छता!

व्हेंटिलेटरच्या ईटी ट्यूब आणि डूमिडीफायरची स्वच्छता वास्तविक सहा-सात तासांनी व्हायला हवी मात्र तसं रुग्णालयात होत नाही. त्यामुळे

मग बुरशीजन्य आजार रुग्णांना होत आहेत.

ही स्वच्छता केली तर दूषित पाणी नाकात जात नाही. त्यामुळे व्हेंटिलेटरची स्वच्छता करणे गरजेचे असते.

चौकट : डॉक्टर म्हणतात

हॉस्पिटलमधील केवळ व्हेंटिलेटरची नव्हे तर सर्व मशीनरीची दिवसातून तीन वेळा स्वच्छता व्हायला हवी. या स्वच्छतामुळे रुग्णांना स्वच्छ ऑक्सिजन आणि वातावरणही चांगले होते. विशेषता रुग्णांशी संबंधित असणाऱ्या मशीनरीचे निर्जंतुकीकरण व्हायला हवे.

डॉ. ज्ञानेश्वर हिरास

........

सिव्हिलमधील असणारे व्हेंटिलेटरची रोज सकाळी स्वच्छता केली जाते. त्यानंतर सायंकाळीसुद्धा स्वच्छता होते. काही वेळेला वॉर्डबॉय दुर्लक्ष करतात. त्यामुळे मग स्वच्छता होत नाही. मात्र यावर आता कडक कारवाई केली जाणार आहे.

डॉ. सुभाष चव्हाण जिल्हा, शल्यचिकित्सक सातारा.

..........

गेल्या आठ दिवसांपासून माझे वडील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल आहेत. अनेकदा ज्यावेळी वॉर्डमध्ये आम्ही या ना त्या कारणाने जात असतो. तेव्हा कोणीही लक्ष देत नाही. शिवाय एकदाही कोणी व्हेंटिलेटरची स्वच्छता करताना आम्हाला दिसले नाही.

-रुग्णाचे नातेवाईक

चौकट: जिल्हा रुग्णालय

जिल्हा रुग्णालयात सकाळी एकदाच व्हेंटिलेटरची स्वच्छता होते. त्यानंतर सायंकाळी स्वच्छता होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र स्वच्छता करताना कोणी आढळून येत नसल्याचे रुग्णांच्या नातेवाइकांनी सांगितले.

चौकट: जम्बो कोरोना सेंटर

या कोरोना सेंटरमध्ये नातेवाइकांना प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे या सेंटरमध्ये नेमके आत मध्ये काय घडतंय याची माहिती बाहेर कोणालाच मिळत नाही. एक तर रुग्ण बरा होऊन बाहेर येतो नाहीतर त्याचा मृत्यू झालेला असतो.

चौकट: खासगी रुग्णालय

साताऱ्यातील एका खासगी रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटरची स्वच्छता करतात का, याची माहिती घेतली असता त्या रुग्णालयांमध्ये दिवसातून चार वेळा स्वच्छता करीत असल्याचे दिसून आले. एकंदरीत रुग्णालयातील व्यवस्थापनाच्या चर्चेनंतर खासगी रुग्णालयांमध्ये स्वच्छतेला महत्त्व दिले जात असल्याचे पाहायला मिळाले.

आकडेवारी-

एकूण रुग्ण -१६४४६३

उपचारानंतर बरे झालेले- १३८८०१

व्हेंटिलेटर लावावे लागलेले रुग्ण-४००

व्हेंटिलेटर लावल्यानंतर झालेले मृत्यू-१५३

जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट- २७ टक्के

Web Title: 153 out of 400 die on ventilator in second wave!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.