पुराच्या पाण्यातून वाहून गेलेल्या मामाचा मृतदेह सापडला सोळा तासांनंतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 02:56 PM2017-10-16T14:56:05+5:302017-10-16T15:02:22+5:30
लोणंद येथे रविवारी अचानक आलेल्या पुराच्या पाण्यातून तिघेजण रस्ता पार करत होते. त्यातील अतुल सखाराम भंडलकर (वय ३५ रा. ठोंबरेमळा, लोणंद) हे बपत्ता झाले. त्यांचा मृतदेह तब्बल सोळा तासांनंतर सोमवारी सकाळी नऊ वाजता आढळून आला.
लोणंद , दि. १६ : लोणंद येथे रविवारी अचानक आलेल्या पुराच्या पाण्यातून तिघेजण रस्ता पार करत होते. त्यातील अतुल सखाराम भंडलकर (वय ३५ रा. ठोंबरेमळा, लोणंद) हे बपत्ता झाले. त्यांचा मृतदेह तब्बल सोळा तासांनंतर सोमवारी सकाळी नऊ वाजता आढळून आला. घटनास्थळापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर बाभळीच्या झाडात अडकलेल्या अवस्थेत सापडला. परंतु या पुराने बहीण-भावाची कायमची ताटातूट केली.
वाई तालुक्यातील मांढरगडावर रविवारी सायंकाळी ढगफुटी झाली. यामुळे पावसाचे पाणी खंडाळ्यासह लोणंद परिसरात आल्याने पूर परिस्थिती ओढावली. अचानक आलेल्या पुरातून जात असताना पुष्पा शिवाजी जाधव (४५) व प्रशांत शिवाजी जाधव (२८) तसेच अतुल भंडलकर हे वाहून जाऊ लागले.
यावेळी उपस्थित तरुणांनी साखळी करून व दोरीच्या साह्याने पुष्पा जाधव व प्रशांत जाधव या मायलेकरांना वाचविले. परंतु अतुल भंडलकर हे पुराच्या पाण्यात वाहून गेले.
नातेवाईक, ग्रामस्थ व पोलिस भंडलकर यांचा रात्रभर शोध घेत होते. परंतु पावसाचा जोर, पाण्याचा प्रवाह व अंधारात शोधकार्यात अडथळे येत होते. सकाळी नऊच्या सुमारास पुराचे पाणी कमी झाल्यानंतर अतुल सखाराम भंडलकर यांचा मृतदेह आढळून आला.