एका तासात १६ जणींची गर्भलिंग निदान चाचणी; खात्रीनंतरच डॉक्टर देत होता अपाॅइंटमेंट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2023 07:10 AM2023-12-14T07:10:02+5:302023-12-14T07:10:26+5:30
फलटण तालुक्यातील पिंप्रद येथे उसाच्या फडातील झोपडीत एकाच वेळी एका तासात १६ महिलांची गर्भलिंग निदान चाचणी केली गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सातारा : फलटण तालुक्यातील पिंप्रद येथे उसाच्या फडातील झोपडीत एकाच वेळी एका तासात १६ महिलांची गर्भलिंग निदान चाचणी केली गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. खात्री झाल्यानंतरच महिलांना अपाॅइंटमेंट देऊन केवळ एका तासात हे काळे कृत्य उरकले गेले.
ज्या १६ महिलांची चाचणी करण्यात आली त्यांची पहिल्यांदा संबंधित डाॅक्टरने खातरजमा केली. त्यानंतर सर्व महिलांना एकाच दिवशी बोलविण्यात आले. सकाळी पावणे नऊ वाजता एका गाडीतून चार महिला अशा चार कार त्या उसाच्या फडात पोहोचल्या. एका गाडीत बसलेल्या चार महिलांपैकी एका महिलेला मुलगा तर दोन महिलांना मुलगी आणि चाैथ्या महिलेला परत यायला सांगितले. त्या महिलेचे दिवस कमी असल्यामुळे गर्भलिंग निदान झाले नसल्याचे डाॅक्टरने सांगितले. या महिलांकडून लाखो रुपये उकळले गेले. हे पैसे तत्पूर्वी गाडीतच घेण्यात आले. तासाभरात गर्भलिंग निदान चाचणी झाल्यानंतर संबंधित डाॅक्टर तेथून निघून गेल्याचे उघड झाले आहे.
एकमेकींची ओळख न होण्यासाठी प्रयत्न...
गाडीत बसलेल्या महिलांची एकमेकींशी ओळख, नाव, पत्ता समजू नये म्हणून त्यांना आपापसांत न बोलण्याच्या सक्त सूचना त्या कार चालकाने केल्या; परंतु तरीही काही महिला गाडीत बोलण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांना चालकाने ‘बोलू नका, नाही तर इथेच तुम्हाला उतरवेन,’ अशी तंबी दिली.
एसटीने येणाऱ्या महिलांना फलटण बसस्थानकाबाहेर तर कार घेऊन आलेल्या महिलांना शिंदेवस्तीजवळील पेट्रोलपंपाजवळ थांबण्यास सांगण्यात आले होते.