टेंभूच्या पाण्यासाठी १६ गावे आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:42 AM2021-09-25T04:42:22+5:302021-09-25T04:42:22+5:30

मायणी : मायणी परिसरातील १६ गावांना शेतीसाठी टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळावे, यासाठी १६ गावांतील ग्रामस्थ आक्रमक झाले ...

16 villages under attack for Tembu water | टेंभूच्या पाण्यासाठी १६ गावे आक्रमक

टेंभूच्या पाण्यासाठी १६ गावे आक्रमक

Next

मायणी : मायणी परिसरातील १६ गावांना शेतीसाठी टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळावे, यासाठी १६ गावांतील ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. या प्रश्नाबाबत प्रत्येक ग्रामपंचायतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यासाठी पत्र तयार केले असून, लवकरच ग्रामस्थांचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे.

सांगली जिल्ह्यातून टेंभू उपसा योजनेचे पाणी सोलापूर जिल्ह्याला जात आहे. दुष्काळी खटाव तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या कलेढोण गावापासून या योजनेचे पाणी जात असूनही, या भागाला आजपर्यंत या पाण्याचा लाभ कधी मिळाला नाही. याठिकाणी हजारो एकर कोरडवाहू शेती आहे. येथील शेतकरी कमी पाण्यावर येणारी व नगदी पिके घेतात. मात्र सततच्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे हातातोंडाला आलेले पीकही अनेकदा वाया जाते. कमी पाण्यावर व माळरानावर येणारे पीक म्हणून प्रारंभी या भागातील शेतकरी द्राक्ष बागांकडे वळले.

आयुष्यभर कमावलेला पैसा बागेसाठी खर्च केला. त्यातून उदरनिर्वाह व परिसरातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी प्रसंगी विकत पाणी घेऊन येथील शेतकरी द्राक्ष बागा जगवत आहेत.

सध्या मोठ्या प्रमाणात द्राक्षे या भागातून निर्यात होत आहेत. मात्र, गेल्या दोन दशकांपासून या भागातील शेतकरी, ग्रामस्थ टेंभू योजनेचे पाणी शेतीसाठी मिळावे, यासाठी प्रयत्न करत आहेत. या परिसरात पाण्यासाठी अनेक लहान-मोठी आंदोलने झाली; परंतु शासन दरबारी म्हणावी तशी दखल घेतली जात नाही. त्यामुळे या भागातील कलेढोण, मुळीकवाडी, पाचवड, तरसवाडी, गारुडी, गारळेवाडी, हिवरवाडी, तरसवाडी, ढोकळवाडी, कान्हरवाडी, कानकात्रे, अनफळे पडळ, औतरवाडी, कठरेवाडी या ग्रामपंचायतींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यासाठी लेखी पत्र तयार केले असून, लवकरच ही पत्रे घेऊन ग्रामस्थ व शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ अजित पवार भेट घेणार आहे.

चौकट

टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी शेतीसाठी मिळावे, यासाठी या भागातील ग्रामस्थांनी राजकारणविरहित लढा उभारला आहे. त्यामुळे या लढ्याचे सर्वसामान्य ग्रामस्थही नेतृत्व करत आहे. शासनाने याबाबत योग्य व सकारात्मक निर्णय घेणे अपेक्षित आहे, तरच या भागाचा विकास होईल.

Web Title: 16 villages under attack for Tembu water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.