फाशीच्या वडाला १६१ वर्षे; पाचजणांना दिली होती फाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 12:32 AM2018-09-08T00:32:08+5:302018-09-08T00:32:12+5:30
स्वप्नील शिंदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ब्रिटिशांविरुद्ध पुकारण्यात आलेल्या १८५७ च्या बंडात सहभागी झालेल्या १७ क्रांतिवीरांना लष्करी न्यायमंडळाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मात्र, क्रूर ब्रिटिशांनी पाचजणांना फाशी दिली. सहाजणांना तोफेच्या तोंडी दिले तर आणखी सहाजणांना गोळ्या घातल्या गेल्या होत्या. १६१ वर्षांपूर्वी ८ सप्टेंबर रोजी शाहूपुरी परिसरातील गेंडामाळावर क्रांतिकारकांना आपल्या प्राणाला मुकावे लागले; परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हुतात्मा स्तंभाची आज दुरवस्था झाली आहे.
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या साम्राज्यवादी धोरणामुळे देशातील अनेक संस्थाने खालसा करण्यात आला होता. त्यामुळे जनतेमुळे अंसतोष पसरला होता. दरम्यान, १८३८ मध्ये प्रतापसिंह महाराजांना ब्रिटिशांनी पदच्युत केल्यानंतर रंगो बापूजी गुप्ते यांनी अन्यायाविरुद्ध दाद
मागितली. मात्र निराश होऊन ते परत आले. त्यांनी तात्या टोपे व नानासाहेब पेशवे यांच्या मदतीने १८५७ च्या उठावासाठी माणसे, पैसे व साहित्य मिळविण्यासाठी फिरत होते. त्यांनी पोलिसांत व इंग्रजी सैन्यात
फितुरी माजवणे, शस्त्रे गोळा करणे दारूगोळा तयार करणे असे नियोजन केले. मात्र, फितुरीमुळे हा उठाव अयशस्वी झाला.
१८५८ च्या आॅगस्टमध्ये तीन जणांचे एक लष्करी न्यायाधीश मंडळ नेमून चौकशी सुरू झाली. रंगो बापूजी सापडले नाहीतच; पण त्यांचा मुलगा सीताराम गुप्तेला बोरगाव येथे पकडण्यात आले. ‘मी बंडात भाग घेतला होता,’ असे त्यांनी उघडपणे सांगितले. याचा खटला १५ मार्च ते २४ मार्च १८५८ पर्यंत चालला. ७ आॅगस्ट १८५८ रोजी पकडलेल्या क्रांतिकारकांची मालमत्ता जप्त करून सर्वांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. ८ सप्टेंबर १८५८ रोजी शिक्षेची अंमलबजावणी झाली.
यामध्ये पाचजणांना फाशी, सहाजणांना गोळ्या घातल्या व इतर सहाजणांना तोफेच्या तोंडी
दिले.
इंग्रजांच्या निर्दयी कृत्यामुळे जेथे १७ क्रांतिवीरांना प्राणास मुकावे
लागले. तीच ही हौताम्यभूमी
आहे, त्याठिकाणी आज तो ऐतिहासिक फाशीचा वड नाही; पण येणाऱ्या पिढ्यान्पिढ्यांना प्रेरणा देईल, असा हुतात्मास्तंभ आहे. मात्र, प्रशासनाने या ठिकाणी व्यवस्था उपलब्ध न केल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. सातारकरांनी ८ सप्टेंबर हा दिवस हुतात्म्यांच्या स्मरणार्थ मानावा, यासाठी सामाजिक आणि राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यावा, अशी सातारकरांची अपेक्षा आहे.
यांना झाली शिक्षा
नारायण पावसकर सोनार, केशव चित्रे, शिवराम कुलकर्णी, विठ्ठल कोंडी, सीताराम गुप्ते यांना फाशी. मुनजी मंदिर्गे, सखाराम शेट्ये, बाबा गायकवाड, येशा गायकवाड, गणेश कारखानीस, नाना रामोशी यांना तोफेच्या तोंडी देण्यात आले. रामजी चव्हाण, बाबा कानगी रामोशी, नामा रामोशी, शिवाजी पोटाले (पाटोळे) पर्वती पोटाले (पाटोळे), पाटलू येशू यांना गोळ्या घालण्यात आल्या.