साताऱ्यात उद्योजकाची १७ लाखांची फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल
By दत्ता यादव | Updated: March 25, 2023 15:42 IST2023-03-25T15:41:57+5:302023-03-25T15:42:26+5:30
ऑईलचा टँकर देण्याच्या बहाण्याने घातला गंडा

साताऱ्यात उद्योजकाची १७ लाखांची फसवणूक, दोघांवर गुन्हा दाखल
सातारा : ऑईलचा टँकर देण्याच्या बहाण्याने एका उद्योजकाची तब्बल १७ लाख ६४ हजार ५६० रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले असून, याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. युवराज किसन कांबळे (रा. मुंबई), अल्लाबक्क्षी फखरुसाब चपाती (फिर्यादीला पत्ता माहित नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नीलेश मधूकर पवार (वय ४१, रा. आशीर्वाद काॅलनी, देगाव रोड, एमआयडीसी, सातारा) यांची साताऱ्यातील एमआयडीसीत ट्रेडिंग कंपनी आहे. वरील संशयितांनी पवार यांना विश्वासात घेऊन त्यांना फसविण्यासाठी कट रचला. भरलेला ऑईल टॅंकर देतो, असे सांगून मोकळ्या ऑईल टॅंकरची व त्यानंतर भरलेल्या ऑईल टॅंकरची खोटी पावती त्यांच्या व्हाँट्सअॅपवर पाठविली.
त्यानंतर पवार यांनी संबंधितांना १७ लाख ६४ हजार ५६० रुपयांची रक्कम पाठविली. मात्र, त्यांनी ऑईलचा टॅंकर त्यांना दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पवार यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी वरील दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक वाघमोडे हे अधिक तपास करीत आहेत.