१७१ ग्रामपंचायतींचे धूमशान
By admin | Published: September 28, 2015 09:59 PM2015-09-28T21:59:35+5:302015-09-28T23:34:36+5:30
१ नोव्हेंबरला मतदान: ३८६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचाही समावेश
सातारा : सातारा जिल्ह्यातील नोव्हेंबर व डिसेंबर २0१५ रोजी मुदत संपणाऱ्या १७१ सार्वत्रिक तर ३८६ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने सोमवारी जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी १ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.
आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दि. १ आॅक्टोबर रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी मंगळवार, दि. १३ ते १७ आॅक्टोबर या कालावधीमध्ये सकाळी ११ ते ४ यावेळेत नामनिर्देशन पत्रे सादर करता येतील. दि. १९ आॅक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. २१ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ ते ३ यावेळेत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. त्याचदिवशी दुपारी ३ नंतर चिन्ह वाटप करण्यात येईल. तसेच निवडणूक लढणाऱ्या अंतिम उमेदवारी यादी प्रसिध्द करण्यात येईल. दि. १ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदान प्रक्रिया होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने दि. ४ नोव्हेंबरपर्यंत निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
सार्वत्रिक निवडणुकांची व कंसात पोटनिवडणुकांची तालुकानिहाय आकडेवारी अशी : सातारा : ९३ (३९), कोरेगाव : ६ (३२), जावली : २0 (६३), कऱ्हाड : ५ (२४), पाटण : ११ (७८), वाई : ६ (४३), महाबळेश्वर : १९ (४२), खंडाळा : ३ (१५), फलटण : २ (१२), खटाव : २ (३५), माण : ५ (३)
सातारा तालुक्यातील कोडोली, अंगापूर, भरतगाव, भाटमरळी, चिंचणेर वंदन, कोरेगाव तालुक्यातील देऊर, वाठार किरोली, जावलीतील भालेघर, महामूलकरवाडी, शेते, मोहाट, कऱ्हाड तालुक्यातील उंब्रज, कोपर्डे हवेली, तांबवे, पाटण तालुक्यातील पाचपुतेवाडी, वाई तालुक्यातील जांभ, ओझर्डे, केंजळ, महाबळेश्वर तालुक्यातील कुंभरोशी, चतूरबेट, उंबरी, बिमरणी, नाकिंदा,
खंडाळा तालुक्यातील मोर्वे, वडगाव, धनगरवाडी, फलटण तालुक्यातील शेरेचीवाडी, पिराचीवाडी, खटाव तालुक्यातील वेटणे, पुनवडी,
माण तालुक्यातील शिंगणापूर, इंजबाब, देवापूर, रांजणी या प्रमुख गावांच्या निवडणुका होणार
आहेत. (प्रतिनिधी)
आचारसंहिता लागू
कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी निवडणूक लागलेल्या एकूण ५५७ ग्रामपंचायतींच्या हद्दीत सोमवार, दि. २८ च्या मध्यरात्रीपासून आचारसंहिता लागू झाली. या ग्रामपंचायतीच्या हद्दींमध्ये राजकीय विकासकामांच्या कार्यक्रमांवर बंदी असणार आहे.