१७१ वर्षे जुन्या वडूथ-आरळे पुलाला भगदाड!

By admin | Published: September 16, 2016 11:13 PM2016-09-16T23:13:32+5:302016-09-16T23:43:19+5:30

अवजड वाहतूक बंद : सातारा - लोणंद, फलटण, बारामतीची वाहने कोरेगावमार्गे वळविली

171-year old Vadad-Aaryale bridge break! | १७१ वर्षे जुन्या वडूथ-आरळे पुलाला भगदाड!

१७१ वर्षे जुन्या वडूथ-आरळे पुलाला भगदाड!

Next

सातारा : सातारा-लोणंद मार्गावरील वडूथ-आरळे येथील कृष्णा नदीवरील १७१ वर्षे जुन्या पेशवेकालीन पुलावरील रस्ता तसेच पायाजवळ शुक्रवारी दुपारी भगदाड पडले. संभाव्य धोका ओळखून हा पूल शुक्रवारपासून जड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. सातारा-लोणंद, फलटण, बारामतीची सर्व वाहने कोरेगाव मार्गे वळविली आहेत.
सातारा-लोणंद रस्त्यावर असलेल्या वडूथ-आरळे येथील कृष्णा नदीवरील पुलाचे काम पेशवेकालीन आहे. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला ब्रिटिश सरकारने पत्र पाठवून या पुलाचे आयुर्मान संपले असल्याचे सूचित केले आहे. महाड दुर्घटनेनंतर ‘लोकमत’ने जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन व पेशवेकालीन पुलांच्या स्थितीवर प्रकाशझोत टाकला होता. त्यावेळी वडूथ-आरळे येथील पुलावर एक-दोन ठिकाणी पडलेले मोठे खड्डे, काटेरी झुडपे याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ई. ई. वाघमोडे यांनी ‘हा पूल वाहतुकीसाठी चांगला आहे,’ असे सांगितले होते.
साताऱ्याकडून लोणंद, बारामती, फलटणकडे जाणारी सर्व वाहतूक वडूथ-आरळे येथील या पुलावरून केली जाते. त्यामुळे हा पूल महत्त्वाचा आहे. आरळे बाजूने महिन्यापूर्वी दोन फुटांचा खड्डा पडला होता. त्या खड्ड्यामध्ये चार डंपर मुरूम टाकून तो मुजविला होता. त्यावेळीच ग्रामस्थ पुलाच्या दुरुस्तीची मागणी केली होती. पुलाला सुरुवात होते तेथे व पायाजवळ मोठे भगदाड पडल्याचे शुक्रवारी दुपारी निदर्शनास आले. त्यामुळे हा पूल अवजड वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय बांधकाम विभागाने घेतला. त्यानुसार ही वाहतूक कोरेगाव मार्गे वळविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
-------------------
उदयनराजेंकडून अधिकाऱ्यांना सूचना
आरळे पुलाला भगदाड पडल्याचे समजल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून या पुलाची तत्काळ पाहणी करून पूल वाहतुकीसाठी बंद करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांनी सहकार्यांसमवेत जाऊन पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा गीतांजली कदम, प्रताप शिंदे उपस्थित होते.
\


‘लोकमत’चा अंदाज ठरला खरा
पुलाच्या दोन्ही बाजूला झाडे व झुडपे वाढली आहेत. तसेच पुलावरील ड्रेनेज पाईप बुजले असल्याने पुलावर मोठ्या प्रमाणात पावसाळ्यामध्ये पाणी साठत असते. प्रत्येक वेळी पुलावर होणाऱ्या डांबरीकरणामुळे पुलाचे वजन वाढले आहे. अशा परिस्थितीत पुलावरून अवजड वाहने वाढली असल्याने वाहतुकीस धोका निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता ‘लोकमत’ने यापूर्वीच व्यक्त केली होती.
अठरा किलोमीटरचे अंतर वाढले...
वडूथ-आरळे पूल अवजड वाहतुकीसाठी बंद केल्याने साताऱ्याकडून लोणंद, बारामती, फलटणकडे जाणारे ट्रक, टेम्पो, एसटी बसेस कोरेगाव मार्गे वळविल्या आहेत. त्यामुळे साधारणत: अठरा कि.मी.चे अंतर वाढले आहे.

Web Title: 171-year old Vadad-Aaryale bridge break!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.