साताऱ्याजवळ शिरूरच्या कांदा व्यापाऱ्याची १८ लाखांची रोकड लांबविली

By दत्ता यादव | Published: December 4, 2023 03:15 PM2023-12-04T15:15:18+5:302023-12-04T15:15:46+5:30

पाळत ठेवणारी टोळी कार्यरत..

18 lakh cash of the onion trader of Shirur near Satara was extended | साताऱ्याजवळ शिरूरच्या कांदा व्यापाऱ्याची १८ लाखांची रोकड लांबविली

साताऱ्याजवळ शिरूरच्या कांदा व्यापाऱ्याची १८ लाखांची रोकड लांबविली

सातारा : बेळगावहून पुण्याकडे जात असताना पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एका कांदा शेतकऱ्याची तब्बल १८ लाखांची रोकड अज्ञात चोरट्याने हातोहात लांबविली. ही धक्कादायक घटना दि. ३ रोजी पहाटे सव्वातीन वाजता वाढे फाटा येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सतीश शंकर ढवळे (वय ३५, रा. वडगाव रासाई, ता. शिरूर, जि. पुणे) हे शेतकरी असून, कांदा विक्रीसाठी ते टेम्पो घेऊन बेळगावला गेले होते. कांदा विक्रीतून आलेली रोकड त्यांच्याजवळ त्यांनी ठेवली होती. त्यांच्यासोबत अन्य दहाजण होते. हे सर्वजण टेम्पोमधून लोणंदमार्गे शिरूरला निघाले होते. यावेळी वाढे फाट्यावर आल्यानंतर सर्वजण रात्री चहा पिण्यासाठी खाली उतरले. याचवेळी अज्ञात चोरट्याने टेम्पोमध्ये ठेवलेल्या बॅगेतील १८ लाख ९२ हजार ५०० रुपयांची रोकड तसेच मोबाइल, पाकीट, कागदपत्रे हातोहात लांबविली. 

चहा पिऊन आल्यानंतर सर्वजण पुढील प्रवासाला निघाले. लोणंदमार्गे जात असताना काही अंतर पुढे गेल्यावर त्यांना बॅगेत पैसे नसल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी जिथं चहा पिला. त्या ठिकाणी परत येऊन चाैकशी केली. मात्र, त्यांचे पैसे काही सापडले नाहीत. चोरट्यांनी पाळत ठेवून त्यांच्या एवढ्या मोठ्या रकमेवर डल्ला मारल्याचे समोर आले. रात्री आठ वाजता त्यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने हे अधिक तपास करीत आहेत.

पाळत ठेवणारी टोळी कार्यरत..

वाढे फाट्यावर यापूर्वीही एका कार चालकाच्या बॅगमधून रोकड, मोबाइल, कागदपत्रे असा ऐवज चोरीस गेला होता. कारची काच फोडून चोरट्यांनी ऐवज चोरला होता. पुन्हा एकदा याच परिसरात अशाच प्रकारची घटना घडल्याने या ठिकाणी मोठी टोळी कार्यरत असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रवाशांवर पाळत ठेवून त्यांच्या वाहनातील ऐवज चोरून नेला जात आहे.

Web Title: 18 lakh cash of the onion trader of Shirur near Satara was extended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.