सातारा शहरात १८१ सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:39 AM2021-05-14T04:39:16+5:302021-05-14T04:39:16+5:30
सातारा : सातारा शहरात कोरोना बाधितांची संख्या उच्चांक गाठू लागली असताना आता सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ होऊ लागली आहे. ...
सातारा : सातारा शहरात कोरोना बाधितांची संख्या उच्चांक गाठू लागली असताना आता सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ होऊ लागली आहे. सद्य:स्थितीला शहर व उपनगरात मिळून तब्बल १८१ प्रतिबंधित क्षेत्र सक्रिय आहेत. निर्बंध पूर्वीप्रमाणे कठोर नसले तरी प्रतिबंधित क्षेत्राची वाढती संख्या चिंतेचा विषय बनू लागली आहे.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाय राबविले जात आहेत. आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचेच स्वॅब तपासणीसाठी घेतले जात होते. आता पालिकेने एखाद्या परिसरात अथवा अपार्टमेंटमध्ये तीनपेक्षा अधिक बाधित रुग्ण सापडल्यास त्या परिसरात रॅपिड ॲंटिजेन टेस्ट मोहीम राबविली जात आहे. नागरिकांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत. संबंधित व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याचे घर किंवा अपार्टमेंट सील करून या परिसरात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्राचे नियम लागू केले जात आहेत.
साताऱ्यातील खेड, शाहूनगर, गोरखपूर, लक्ष्मी टेकडी, विलासपूर, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, शनिवार पेठ, माची पेठ आदी ठिकाणी बाधित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. या परिसरात तब्बल १८१ सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र सध्या कार्यरत असून यात दररोज भर पडू लागली आहे. चौदा दिवसांनंतर प्रतिबंधित क्षेत्राचे नियम शिथिल केले जात असून बॅरिकेडिंगही काढले जात आहे.
(चौकट)
... ही तर धोक्याची घंटा !
वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच सातारा शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातही वाढ होऊ लागली आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांची आरोग्य पथकाकडून टप्प्याटप्प्याने तपासणी केली जात आहे. असे असताना प्रतिबंधित क्षेत्रातील काही नागरिक सायंकाळ होताच घराबाहेर पडतात. प्रतिबंधित क्षेत्रात फेरफटका मारतात. शहरात हा प्रकार वारंवार पहावयास मिळत असून, तो धोक्याची-घंटा ठरू शकतो. त्यामुळे प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे बनले आहे.