राज्यात चार दिवसांत १८६ ठिकाणे आगीच्या भक्ष्यस्थानी, कोणत्या जिल्ह्यात प्रमाण अधिक?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 03:35 PM2022-03-03T15:35:14+5:302022-03-03T15:35:38+5:30

वणवे हे वन्यजीव आणि पशु - पक्ष्यांच्या जीवावर उठतात

186 fire incidents in four days in the state | राज्यात चार दिवसांत १८६ ठिकाणे आगीच्या भक्ष्यस्थानी, कोणत्या जिल्ह्यात प्रमाण अधिक?

राज्यात चार दिवसांत १८६ ठिकाणे आगीच्या भक्ष्यस्थानी, कोणत्या जिल्ह्यात प्रमाण अधिक?

Next

दीपक शिंदे

सातारा : उन्हाळा आला की डोंगराला वणवे लागतात. साधारणत: डिसेंबर महिन्यापासूनच हा प्रकार सुरू होतो. हे वणवे बंद व्हावेत यासाठी वनविभागाकडून खूप प्रयत्न केले जातात. मात्र, अनेक गैरसमजातून लागलेले वणवे हे वन्यजीव आणि पशु - पक्ष्यांच्या जीवावर उठतात. गेल्या चार दिवसांत राज्यात कोकणातील अलिबागपासून ते अगदी गडचिरोलीतील सिरोंचापर्यंत सुमारे १८६ ठिकाणी आग लागली आहे.

डोंगरांना लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी वनविभागाकडून वणवा लागण्यापूर्वीच प्रयत्न केले जातात. जाळरेषा काढून वणवा क्षेत्राबाहेर येणार नाही यासाठी खूप प्रयत्न केले जातात. तरीदेखील लागलेला वणवा बऱ्याचदा अटोक्यात आणता येत नाही.

हा वणवा संपूर्ण जंगल उद्ध्वस्त करतो आणि पुढील सुमारे एक महिना प्राण्यांना आणि पशु-पक्ष्यांना अन्नाशिवाय दिवस काढावे लागतात. दरम्यानच्या काळात प्राणी मानवी वस्तीकडे येण्याचे प्रमाण वाढते. त्यावेळीही जंगली श्वापदे मानवी वस्तीत आल्याचा गवगवा होतो. यासाठी वणवा आणि आगीपासून बचाव करणे आणि वणवा लावणाऱ्यांना परावृत्त करण्याची आवश्यकता आहे.

गेल्या चार दिवसांत मुंबईजवळ मँग्रोव्हच्या घाटकोपर परिसरात आग लागत आहे. बुधवारीही याठिकाणी आग लागल्याची नोंद झाली आहे. त्याबरोबरच मानखुर्द, ठाण्याच्या हिरेघर, अलिबागजवळ पाली, रोहा, पुण्याजवळ पिंपरकुंटे, भोर, आंबेगाव, जुन्नर, साताऱ्यातील मेढा, हुमगाव, पाटण जवळील भोसेगाव, नाशिकमधील सिन्नर जवळील बोरखिंड, कोल्हापुरातील कापशी, नंदुरबारमधील भुसा, चंद्रपूरमधील बाखर्डी आणि गडचिरोलीतील रेपोनल्ली, आंबेझरा याठिकाणी आगी आणि वणवे लागले होते.

वणव्याबाबतचे गैरसमज दूर व्हावेत

रानाला वणवा लावला तर पुन्हा नवीन गवत येते आणि जनावरांना चारा मिळतो. असा लोकांमध्ये गैरसमज आहे. तो पहिल्यांदा दूर केला पाहिजे. जुने गवत त्याच्या वयोमर्यादेनुसार वाळून पडून जाते. त्याचे खतच तयार होते. त्यातूनच नवीन अंकुर फुटत असतो. पाऊस पडला की त्याला अधिक तरारी येते. त्यामुळे रान जाळल्यानंतरच नवीन गवत येते हा गैरसमज लोकांनी दूर करण्याची आवश्यकता आहे.

चार दिवसांतील आगी आणि वणवे

बुधवार ( दि. २ मार्च ) ६३ ठिकाणी
मंगळवार ( दि. १ मार्च ) - ६० ठिकाणी
सोमवार ( दि. २८ फेब्रुवारी ) ४२ ठिकाणी
रविवार ( दि. २७ फेब्रुवारी ) २१ ठिकाणी


वन क्षेत्राशिवाय खासगी क्षेत्रातही काही आगी लागत असतात. वन क्षेत्र त्यांच्या जवळ येत असेल तर ती आग वनक्षेत्रातही पसरण्याची शक्यता असते. यासाठी आम्ही आवश्यक ती खबरदारी घेत असतो. तरीही उन्हाळा आला की आगी वाढण्याचे प्रमाणा वाढते. जाळरेषा काढून आम्ही वणवे रोखण्यासाठी प्रयत्न करतो. पण, लोकसहभागही महत्त्वाचा आहे. - एल. एन. पोतदार, वनअधिकारी, पाटण

Web Title: 186 fire incidents in four days in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.