Satara: कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2024 01:39 PM2024-08-29T13:39:14+5:302024-08-29T14:02:53+5:30
नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा, १०२.४३ टीएमसी पाणीसाठा
कोयनानगर : कोयना धरण व परिसरात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी धरणातील पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आज, गुरुवारी सकाळी पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणातून कोयना नदीत ३३,०५० क्युसेक्सने विसर्ग सुरु असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील चार पाच दिवस मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली. तसेच साठवण क्षमता संपुष्टात येत असलेने धरणाची पाणीपातळी नियंत्रीत करण्यासाठी मंगळवारी धरणाच्या पायथा वीजगृहातुन २१०० क्युसेक्स व सहा वक्र दरवाज्यातून १०,३५५ क्युसेक्स असा एकुण १२,४५५ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू केला होता. यावेळी धरणातील पाण्याची आवक ४० हजार क्युसेक्सने सुरू होती.
बुधवारी पाण्याची आवक ४२ हजार क्युसेक्सवर पोहचल्याने धरणाचे सहा वक्र दरवाजे सव्वा फुटावर फुटावर असलेले दोन फुटांवर नेण्यात आले होते. तरीही पाण्याची आवक सुरु असल्याने दरवाजे दोन फुटांवरून साडे तीन फुट करत विसर्ग वाढविण्यात आला आहे. सकाळी आठ वाजता कोयना धरणातील पाणीसाठा १०३.४१ टीएमसी होता.
त्यामुळे कोयना नदीत पायथावीजगृहातुन २१०० व सहा वक्र दरवाज्यातून ३०९५० असा एकुण ३३०५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच ओढे नाले ओसंडून वाहत असलेनं कोयना नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे.