महाबळेश्वर तालुक्यातील १९ गावांनी कोरोनाला रोखले वेशीवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:29 AM2021-06-02T04:29:41+5:302021-06-02T04:29:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पाचगणी : कोरोनाने गावच्या गावे बाधित होत असताना महाबळेश्वर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील १९ गावांनी मात्र गेल्या ...

19 villages in Mahabaleshwar taluka blocked the corona at the gate | महाबळेश्वर तालुक्यातील १९ गावांनी कोरोनाला रोखले वेशीवरच

महाबळेश्वर तालुक्यातील १९ गावांनी कोरोनाला रोखले वेशीवरच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पाचगणी : कोरोनाने गावच्या गावे बाधित होत असताना महाबळेश्वर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील १९ गावांनी मात्र गेल्या पंधरा महिन्यांत कोरोनाला गावात फिरकूच दिले नाही. याकरिता स्थानिक पातळीवर ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासनाने राबविलेल्या कोरोना नियमांचे काटेकोर पालन, यामुळे ही गावे आजही कोरोना प्रादुर्भावापासून कोसो दूर आहेत.

महाबळेश्वर तालुक्यात १११ गावे असून, सर्वच गावे कोरोनाचा शिकार झाली आहेत. मात्र, कांदाटी खोऱ्यातील १९ गावांनी गेल्या पंधरा महिन्यांपासून विविध उपाययोजना राबवीत स्वतःची गावे कोरोना संसर्गाच्या विषाणूपासून दूरच ठेवली आहेत. यामध्ये आमशी, रामेघर, शिंदी, वलवन, आकल्पे, निवळी, आरव, मोरणी, उचाट या नऊ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतींतर्गत येणारी सोनाट, खांबिल पोकळे, मजरेवाडी, चकदेव, म्हाळुंगे, दोडणी, कांदट, झाडणी, पिंपरी तांब, शिरगार या दहा गावांनी कोरोनाला स्पर्शही करू न देता गावाच्या वेशीवरूनच दूर लोटले.

१)चौकट :

कांदाटी खोऱ्यातील या गावांचा संपर्क बाजारासाठी कोकणातील खेड शहराशी येतो. येथील ग्रामस्थांनी कोकणातून येणारे रस्ते बंद करून येणाऱ्या व्यक्तीस घरी विलगीकरणाच्या नियमाचे पालन करणे सक्तीचे केले, तसेच मुंबईकर व्यक्तींना हेच नियम लागू केले होते; परंतु मुंबईकर लोकांनी गावी फिरकने स्वतःच टाळले, त्यामुळे गावे संसर्गापासून दूरच राहिली.

चौकट :

ग्रामपंचायतस्तरावर स्थानिक प्रशासन व ग्रामस्थांनी हातात घालून काम केले. त्यांना येथील ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक अमोल धुमाळ, (शिंदी वलवन,) प्रकाश मणिराम भोये,( मोरणी आरव) निजाम शेख, (रामेघर,) नानासाहेब बनकर, (आमशी) सुनील भोई, (आकल्पे) पोपटराव जगताप, (निवळी) तारळकर मॅडम, (उचाट) यांनी मोलाचे मार्गदर्शन करून ग्रामस्थांच्या साथीने कोरोनाला गावात फिरकूच दिले नाही.

प्रतिक्रिया :

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळेच कोरोनाला दूर ठेवणे सर्व सहकारी मित्रांना शक्य झाले आहे. हे यश तालुका प्रशासनाचे आहे.

अमोल धुमाळ, ग्रामसेवक शिंदी, वलवण, महाबळेश्वर

प्रतिक्रिया :

कांदाटी तसा दुर्गम भाग. येथे संसर्गाची बाधा झाली असती तर प्रशासनाला आरोग्य व्यवस्था पुरविणे अवघड झाले असते; पण माझ्या सहकारी मित्र ग्रामसेवकांनी व ग्राम दक्षता कमिटीतील कोरोना योद्‌ध्यांच्या योग्य नियोजनाने कोरोनाला वेशीवरच ठेवले, याचा प्रशासनास सार्थ अभिमान आहे.

- नारायण घोलप, गटविकास अधिकारी, महाबळेश्वर

Web Title: 19 villages in Mahabaleshwar taluka blocked the corona at the gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.