जिल्ह्यातील आठ डेपोतून ३५९ जणांना १९७७ ब्रास वाळू - जिल्हाधिकारी
By दीपक देशमुख | Published: January 25, 2024 07:14 PM2024-01-25T19:14:11+5:302024-01-25T19:16:11+5:30
ऑनलाईन पध्दतीने वाळूची नोंदणी झाल्यानंतर १५ दिवसांत वाळू डेपोतून वाळू घेऊन जाणे आवश्यक आहे.
सातारा: शासनाच्या धोरणानुसार प्रति ब्रास सहाशे रुपये इतक्या कमी दराने सर्वसामान्यांना वाळू मिळत असून आज अखेर ३५९ नागरिकांनी महाखनिज नोंदणी करुन योजनेचा लाभ घेतलेला आहे. वाई व कराड येथील एकुण वाळू डेपोंमध्ये एकूण २७७८ ब्रास वाळूची नोंदणी झालेली असून त्यापैकी १९७७ ब्रास वाळूचे वितरण केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिली आहे.
जिल्ह्यामध्ये शासनामार्फत वाळू उत्खनन, वाहतूक व विक्री साठवणूक तसेच विक्री, व्यवस्थापन याबाबतचे सर्वकष धोरण राबविण्यात येत आहे. जिल्हास्तरीय वाळू सनियंत्रण समितीने ऑनलाईन पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवून वाई तालुक्यातील आसले, एकसर, पाचवड आणि वाई हे चार वाळू डेपो आणि कराड तालुक्यातील सुपने, इंदोली, घारेवाडी आणि खालकरवाडी हे चार वाळू डेपो अशा एकूण आठ वाळू डेपोंसाठी मंजूरी दिलेली आहे.
या वाळूडेपोंमध्ये १४१३ ब्रास वाळूसाठा उपलब्ध असुन नारिकांना महाखनिज प्रणालीवर वाळू मागणी बाबत नोंदणी करुन वाळू प्राप्त करुन घेता येईल. ऑनलाईन पध्दतीने वाळूची नोंदणी झाल्यानंतर १५ दिवसांत वाळू डेपोतून वाळू घेऊन जाणे आवश्यक आहे. वाळू डेपोपासून बांधकाम ठिकाणापर्यंत वाहतूक खर्च भरण्याची जबाबदारी ग्राहकाची असून वाळूची वाहतुकीसाठी वाहनांची व्यवस्था डेपोच्या ठिकाणी उपलब्ध केली आहे. सर्वसामान्यांनी शासनाच्या वाळू धोरण योजनेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी आवाहन केले आहे. तसेच अवैध मार्गाने वाळू प्राप्त करुन घेऊ नये. वाळू नोंदणी संदर्भात काही अडचणी आल्यास संबंधित तहसिल कार्यालय किंवा गौणखनिज शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय सातारा यांचेशी संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अशी करा नोंदणी
वाळू खरेदीसाठीची नोंदणी ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या www.mahakhanij.maharashtra.gov.in या वेबसाईटवर किंवा तालुक्यातील सेतू केंद्रातून नोंद करणे आवश्यक आहे.
आवश्यक कागदपत्रे
ऑनलाईन पध्दतीने वाळू मागणी नोंदविताना रेशनकार्ड, आधार कार्ड, घरकूल प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी, इ. कागदपत्रे व मोबाईल क्रमांक अनिवार्य आहे.