मुदतीत पीक विमा अर्जाचा पाऊस; सातारा जिल्ह्यात तीन लाखांजवळ आकडा ! 

By नितीन काळेल | Published: July 16, 2024 07:24 PM2024-07-16T19:24:54+5:302024-07-16T19:25:09+5:30

सातारा : शेतकऱ्यांना शेती करताना विविध संकटांचा सामना करावा लागतो. यासाठी पीक विमा योजना असून एक रुपया भरून सहभाग ...

2 lakh 84 thousand applications were received for crop insurance scheme from Satara district | मुदतीत पीक विमा अर्जाचा पाऊस; सातारा जिल्ह्यात तीन लाखांजवळ आकडा ! 

मुदतीत पीक विमा अर्जाचा पाऊस; सातारा जिल्ह्यात तीन लाखांजवळ आकडा ! 

सातारा : शेतकऱ्यांना शेती करताना विविध संकटांचा सामना करावा लागतो. यासाठी पीक विमा योजना असून एक रुपया भरून सहभाग घेता येत आहे. यावर्षी खरीपसाठी मुदतीत २ लाख ८४ हजारांवर अर्ज आले आहेत. त्यामुळे गेल्यावर्षीचा विक्रम मोडला आहे. त्यातच शासनाने आता ३१ जुलैपर्यंत मुदत वाढविली वाढविल्याने विमाधारक शेतकरी अर्जांची संख्या चार लाखांपर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांना शेती करताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे पीक उत्पादनालाही फटका बसतो. यासाठी पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पावसातील खंड, ढगफुटी, चक्रीवादळ आदी कारणाने पिकाचे नुकसान झाल्यास विमा उतरविलेल्या पिकांसाठी भरपाई देण्यात येते. यासाठी पूर्वी शेतकऱ्यांना ठराविक रक्कम भरावी लागत होती. तर राज्य आणि केंद्र शासनाचाही वाटा असायचा; पण राज्य शासनाने गेल्यावर्षीच्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना एक रुपयांत पीक विमा देण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षीही एक रुपयात पीक विमा देण्याची योजना सुरू आहे. या योजनेत बिगर कर्जदार शेतकरीही सहभागी होऊ शकतात.

जिल्ह्यात गेल्यावर्षी या योजनेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. सुमारे पावणे तीन लाखांहून अधिक अर्ज आले होते. यामध्ये माण तालुक्यातील सर्वाधिक शेतकरी सहभागी झाले होते. त्यातच गेल्यावर्षी दुष्काळ पडल्याने लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यास मदत झाली. सध्या शेतकऱ्यांच्या खात्यावर गेल्यावर्षीच्या खरीप हंगामातील नुकसानीचे पैसे जमा होत आहेत. त्यामुळे यंदाही शेतकरी विमा उतरवू लागले आहेत. यासाठी १५ जुलै अंतिम मुदत होती. या मुदतीत १ लाख ४ हजार शेतकऱ्यांनी विविध पिकांसाठी २ लाख ८४ हजार अर्ज दाखल केले होते. आता पीक विम्यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत वाढविण्यात आलेली आहे. त्यामुळे सहभागी शेतकऱ्यांचा आकडा वाढणार आहे. कारण, अजुन १५ दिवस शेतकऱ्यांना पीक विम्यासाठी अर्ज करता येणार आहे.

खरीप हंगामातील पीक विमा भरण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत होती. या मुदतीत २ लाख ८४ हजार अर्ज दाखल झाले. आता विमा भरण्याची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांनी एक रुपया भरुन या योजनेचा लाभ घ्यावा. यासाठी अधिसुचित केलेल्या पिकांचा विमा बॅंका, विकास सेवा सोसायटी, महा ईसेवा केंद्र, विमा प्रतिनिधींकडे अर्ज भरावा. - भाग्यश्री फरांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Web Title: 2 lakh 84 thousand applications were received for crop insurance scheme from Satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.