धानाई मंदिरात २ लाखांची चोरी
By admin | Published: September 23, 2016 11:21 PM2016-09-23T23:21:21+5:302016-09-24T00:21:29+5:30
कार्वे : दानपेटीतील रकमेसह मूर्तीवरील दागिने लंपास
कऱ्हाड/कार्वे : महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले कऱ्हाड तालुक्यातील कार्वे येथील धानाईदेवीच्या मंदिरात शुक्रवारी पहाटे चोरट्यांनी दानपेटीसह मूर्तीवरील सुमारे दोन लाखांचे दागिने चोरट्यांकडून लंपास करण्यात आले. या घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्वे येथे धानाईदेवीचे भव्य मंदिर आहे. नवरात्रोत्सवात या मंदिरामध्ये महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. यंदाचा नवरात्रोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना शुक्रवारी पहाटे चोरट्यांनी मंदिराच्या पूर्वेकडील दरवाजाचे कुलूप तोडले. मंदिरात प्रवेश करताच त्यांनी सर्व सीसीटीव्ही फोडले. त्यानंतर दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील रोकड चोरली. तसेच मंदिराच्या गाभाऱ्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून मूर्तीवरील सोन्या-चांदीचे दागिनेही लंपास करण्यात आले. धानाईदेवी मंदिरानजीकच्या जाखाई मंदिरातही चोरट्यांनी धुमाकूळ घातला. मंदिराचे कुलूप कटावणीने तोडून मूर्तीवरील दागिने व दानपेटीतील रक्कम त्यांनी चोरली.
परिसरातील ग्रामस्थ रात्री दीड वाजेपर्यंत मंदिर परिसरात होते. तसेच त्याठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठी एका कर्मचाऱ्याचीही नेमणूक आहे. संबंधित कर्मचारी रात्री दोन वाजेपर्यंत जागा होता. सर्वजण झोपी गेल्यानंतर पहाटे चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला असावा, अशी शक्यता आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्यासह पोलिस पथकाने त्याठिकाणी भेट दिली. मंदिरातून सुमारे दोन लाखांचा ऐवज चोरीस गेल्याची माहिती धानाईदेवी ट्रस्टचे विश्वस्त निवासराव थोरात यांनी पोलिसांना दिली. (प्रतिनिधी)
श्वान घुटमळले
चोरीच्या घटनेनंतर शुक्रवारी सकाळी साताऱ्याच्या श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. श्वान मंदिरातून बाहेर पडल्यानंतर उत्तर बाजूस जाऊन घुटमळले. त्यामुळे तेथून चोरटे वाहनाने पसार झाले असावेत, असा पोलिसांचा कयास आहे.