साताऱ्यात दिव्यांग महिलेची २० लाखांची फसवणूक, एकावर गुन्हा दाखल
By दत्ता यादव | Published: November 2, 2023 02:00 PM2023-11-02T14:00:19+5:302023-11-02T14:01:07+5:30
पीडित महिलेचा दिव्यांग आणि अंधपणाचा गैरफायदा घेतला
सातारा : चांगला परतावा देण्याच्या आमिषाने एका दिव्यांग महिलेची तब्बल २० लाखांची फसवणूक झाली असून, याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात एकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
योगेश मोहन तोरडमल (रा. शिरढोण, ता. कोरेगाव, जि. सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित महिला ४१ वर्षांची असून ती दिव्यांग आहे. त्या महिलेला योगेश तोरडमल याने गॅलेक्सी इंटरनेट कंपनीच्या नावे गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देतो, असे आमिष दाखवले. त्यानंतर पीडित महिलेने त्याने सांगितलेल्या कंपनीच्या खात्यावर वेळोवेळी २० लाख रुपये जमा केले.
मात्र, त्यानंतर तो परतावा देण्यास टाळाटाळ करू लागला. दिलेले पैसे परत मागितले असता पैसेही देण्यास नकार देऊ लागला. पीडित महिलेचा दिव्यांग आणि अंधपणाचा गैरफायदा घेऊन तोरडमलने आर्थिक फसवणूक केली. या प्रकारानंतर संबंधित महिलेने सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. हवालदार भिसे हे अधिक तपास करीत आहेत.