विसर्जनासाठी २0 लाखांचं तळं!
By admin | Published: September 21, 2015 09:02 PM2015-09-21T21:02:56+5:302015-09-21T23:44:07+5:30
सातारा पालिकेची तयारी : प्रतापसिंह शेती फार्ममध्ये प्रशासन युद्धपातळीवर
सातारा : शहरातील सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी सातारा पालिकेने मोठ्या आकाराचं कृत्रिम तळं तयार करण्याचं काम हाती घेतलं आहे. येथील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या असणाऱ्या प्रतापसिंह शेती फार्ममध्ये हे तळं आकार घेत आहे. यासाठी पालिकेला अंदाजे २0 लाखांचा निधी खर्च करावा लागणार आहे. या तळ्यात शहरातील २0 फूटापर्यंतच्या असस्त्र मूर्तीही विसर्जित करता येणार आहेत.शहरातील मंगळवार तळ्यामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती विसर्जित केल्या जात होत्या. मात्र न्यायालयानेच कान टोचल्याने आता प्रशासनाला ऐतिहासिक तळ्यांमध्ये मूर्ती विसर्जनाला बंदी घालावी लागली आहे. त्यामुळे परंपरेप्रमाणे मंगळवार तळे, मोती तळे या तळ्यांमध्ये गणेश मूर्ती विसर्जन करता येणार नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या सूचनेनुसार सातारा पालिकेने विसर्जनाबाबत पर्यायी उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
पालिकेने गोडाली, हुतात्मा उद्यान व दगडी शाळा अशा तीन ठिकाणी शहराच्या पूर्वेकडील गणेश मूर्ती विसर्जनाची सोय केली होती. आता पश्चिम भागातील घरगुती व संपूर्ण शहरातील सार्वजनिक गणेश मूर्ती विसर्जनासाठी प्रतापसिंह शेती फार्ममध्ये कृत्रिम तळे तयार केले आहे. या कामावर पालिकेचे विविध खात्याचे अधिकारी व ३0 ते ३५ कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून राबत आहेत. चार पोकलेनच्या माध्यमातून १७५ बाय ४0 फूट आकाराचे तळे खोदण्यात आले आहे. रविवारी मध्यरात्री उशिरापर्यंत हे काम सुरु होते. या तळ्यावर टाकण्यासाठी सुमारे ६४0 मीटर आकाराचा कृत्रिम तळ्यासाठी लागणारा प्लास्टिक कागद आणण्यात आला असून हा प्रचंड मोठा कागद तळ्यामध्ये अंथरण्याचे काम सुरु आहे.
पालिकेने या कामाचे कंत्राट दिले असल्याने ठेकेदाराच्या कामगारांसोबतच पालिकेचे ३0 ते ३५ कर्मचारी इथे राबत आहेत. या कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर जिल्हा परिषदेनेही मंजुरी दिली आहे. राधिका रस्त्यालगतच हे तळे असून रस्त्याच्या बाजूला गणपती विसर्जनासाठी मचान तयार करण्यात आले आहे. पालिकेने विसर्जनादिवशी एक क्रेन मागविली आहे. ५0 कर्मचारी विसर्जनादिवशी या ठिकाणी कार्यरत असणार आहेत. (प्रतिनिधी)
मचाण असुरक्षित...
कृत्रिम तळ्यांशेजारी मूर्ती विसर्जनासाठी बांबूपासून मचाण तयार करण्यात आले आहे. हे बांबू तळयाच्या काठाला असणाऱ्या मातीच्या भिंतीत रोवण्यात आले आहे. जास्त वजन पडल्यास ही मचाण तळ्यात कोसळण्याची शक्यता आहे. गणेश विसर्जनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांसाठीही ते धोकादायक आहे.
तळे भरण्यासाठी लागणार ६५ लाख लिटर पाणी
प्रतापसिंह शेती फार्ममधील तळे भरण्यासाठी ६५ लाख लिटर पाणी लागणार आहे. शेती फार्ममधील दोन विहिरींतून या तळ्यात पाणी सोडण्यात येणार आहे, तसेच तोडकर, कवारे, औंधकर यांनीही आपल्या विहिरींचे पाणी विसर्जनासाठी देण्याचे मान्य केल्याचे पालिकेतील अभियंता अनंत प्रभुणे यांनी सांगितले.
विसर्जनासाठी
आता ४ कृत्रिम तळी...
सातारा शहरामध्ये आता चार कृत्रिम तळी तयार झाली आहेत. एक तळे गोडोलीतील कर्मवीर बागेत आहे, दुसरे सदरबझारमध्ये दगडी शाळेत, तिसरे हुतात्मा उद्यानात तर चौथे प्रतापसिंह शेती फार्ममध्ये तयार झाले आहे. या तळ्यांमुळे ऐतिहासिक तळ्यांमधील मूर्ती विसर्जन थांबून पाणी दूषित होण्यास प्रतिबंध बसणार आहे.
विसर्जनानंतर काय,
याबाबत पालिका निरुत्तर
मूर्ती विसर्जनानंतर या कृत्रिम तळ्यांचे कारायचे काय?, हा प्रश्न आहे. केवळ मूर्ती विसर्जनासाठी केलेली ही तळी बांधिव नाहीत. त्यातच विसर्जित केलेल्या मूर्तींचे करायचे काय? याबाबतही पालिका निरुत्तर आहे.