२० जणांचे झाले ‘बॅड’ मॉर्निंग
By admin | Published: July 21, 2016 11:08 PM2016-07-21T23:08:47+5:302016-07-21T23:31:00+5:30
गुडमॉर्निंग पथकाची कारवाई : सकाळच्या प्रहरी पोलिस स्टेशनची स्वारी
तारळे : तारळे सह विभागात गुडमॉर्निंग पथकाने अचानक धरपकड मोहीम राबवून उघड्यावर शौचास बसलेल्या ३० जणांना ताब्यात घेतले. पथकाने केलेल्या धडाकेबाज कारवाईमुळे अनेकांची सकाळी सकाळी ‘बॅड’ मॉर्निंग झाली. तर सकाळच्या प्रहरी त्यांना चक्क पोलिस स्टेशनची स्वारी करावी लागली.
सुमारे दोन वर्षांपूर्वी निर्मलग्राम योजना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करून वेळोवेळी गुडमॉर्निंग मोहीम राबविली गेली. याचा धसका घेऊन अनेकांनी शौचालये बांधून ही मोहीम फत्ते केली. ग्रामसेवकांनी वेळोवेळी लोकांना शौचालय बांधण्यासाठी आवाहनही केल्यावर त्यास प्रतिसाद देत अनेकांनी शौचालये बांधली तर काहींनी नाही.
परिणामी गावातील शौचालये न बांधलेल्यांकडून गावाच्या प्रवेशद्वारावरच दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण केले जाऊ लागले. यावर उपाय शोधण्यासाठी व ग्रामस्थांची त्रासातून सुटका करण्यासाठी पाटण पंचायत समिती, ग्रामसेवक, गटविस्तार अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी व तारळे पोलिस दूरक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुडमॉर्निंग पथक तयार केले.
या पथकाने गुरुवारी पहाटे पाच वाजल्यापासून गटविस्तार अधिकारी एस. डी. घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली तारळे, वेखंडवाडी, वजरोशी, कडवे, काटेवाडी, कोंजवडे, पांढरवाडी या गावांत पथकाने धडक कारवाई करून उघड्यावर शौचाला बसणाऱ्या २० जणांना पकडले.
पथकामध्ये विस्तार अधिकारी एस. पी. घोलप, एस. व्ही. बोलके, सी. एस. पाटील, व्ही. जे. ढाणे, व्ही. के. ढाणे, व्ही. एल. लोखंडे, ए. एन. कागदी, के. यू. महाडिक, बी. बी. ढेबे, पी. बी. कांबळे, ए. बी. सोनावले, दीपक बारटक्के, व्ही. एस. काकडे, एस. बी. मोरे सहभागी होते. (वार्ताहर)