कृषीमंत्र्यांची घोषणा वाऱ्यावर; ‘प्रोत्साहन’ नाही खात्यावर; सातारा जिल्ह्यातील २० हजार शेतकरी प्रतिक्षेत
By नितीन काळेल | Published: December 7, 2023 06:31 PM2023-12-07T18:31:01+5:302023-12-07T18:31:49+5:30
१५ ऑगस्टपर्यंत लाभ देण्याची घोषणा केली होती
सातारा : नियमीत पीक कर्जफेडमधील राहिलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ देण्याची घोषणा कृषीमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनात करुनही आतापर्यंत अनेक लाभाऱ्थींच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. सातारा जिल्ह्यातील अशा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या सुमारे २० हजार आहे. आताच्या हिवाळी अधिवेशनातही यावर चर्चा होऊ शकते. त्यामुळे कृषीमंत्र्यांची घोषणा वाऱ्यावर, ‘प्रोत्साहन’ नाही खात्यावर अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलेली आहे.
राज्यात सुमारे चार वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले होते. त्यावेळी नियमित कर्जफेड आणि दोन लाखांवर पीक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही मदतीची घोषणा करण्यात आली होती. या योजनेला महात्मा फुले कर्जमाफी योजना असे नाव देण्यात आले होते. सुरुवातीच्या टप्प्यात दोन लाखांपर्यंत थकित कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करुन प्रमाणिकरण केले. नंतरच रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली. त्यातच सत्ता बदलानंतर आताच्या राज्य शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास सुरुवात केली. पण, अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही.
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील यादी गेल्यावर्षी दिवाळीच्या अगोदर जाहीर झाली होती. तर दुसरी यादी गेल्यावर्षीच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केली. ही यादी सर्वांत मोठी होती. त्यानंतरही काही याद्या जाहीर झाल्या. त्यामुळे आतापर्यंत या प्रोत्साहन योजने अंतर्गत जिल्ह्यातील २ लाख १७ हजारांहून अधिक शेतकरी खातेधारकांना विशिष्ट क्रमांक मिळालेला आहे. त्यातील २ लाख १६ हजारांवर शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. तर आतापर्यंत १ लाख ९५ हजारांवर शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रोत्साहन लाभाची रक्कम जमा झालेली आहे. असे असलेतरी अजुनही जिल्ह्यातील २० हजारहून अधिक शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. त्यामुळे त्यांचे बॅंकेतील हेलपाटे सुरूच आहेत. लाभ कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.
१५ आॅगस्टपर्यंत मिळणार म्हणून अधिवेशनात घोषणा..
विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत झाले होते. त्यावेळी विरोधी आमदारांनी प्रोत्साहन योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचा प्रश्न उपस्थित केला होता. यावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रोत्साहनमधून राहिलेल्या शेतकऱ्यांना १५ आॅगस्टपर्यंत लाभ देण्याची घोषणा केली होती. ही घोषणा होऊन तीन महिने होऊन गेलेतरी अनेकांना लाभच मिळालेला नाही.
प्रोत्साहनचा ५० हजारांपर्यंतचा यांना लाभ..
राज्य शासनाच्या निर्णयामुळे नियमित पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ मिळालाय. यासाठी २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० या वर्षातील तीनपैकी दोन वर्षे शेतकरी थकबाकीदार नसावा, अशी अट आहे. तरच ५० हजारांपर्यंत हा लाभ मिळणार आहे. एखाद्या शेतकऱ्याचे नियमित पीक कर्ज २५ हजार असेल तर त्याला तेवढीच रक्कम मिळणार आहे.
जिल्हा बॅंकेकडील शेतकऱ्यांना ६६७ कोटी..
जिल्ह्यात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या माध्यमातून पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच ही बॅंक दरवर्षी १०० टक्क्यांहून अधिक उद्दिष्ठ गाठते. जिल्ह्यात दोन महिन्यापूर्वीपर्यंत प्रोत्साहन लाभाचे ६९२ कोटी ५८ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले होते. त्यातील ६६६ कोटी ८८ लाख ९२ हजार रुपये हे जिल्हा बॅंकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळाले आहेत.