कर्मचारी दोनशे अन् गाड्या चारशे !
By admin | Published: March 31, 2015 10:20 PM2015-03-31T22:20:26+5:302015-04-01T00:10:06+5:30
एसटी कामगारांनाच मिळेना जागा : डोकेदुखी थांबविण्यासाठी सातारा आगाराने तयार केले ‘पार्किंग स्टिकर’; जिल्ह्यातील अभिनव उपक्रम
सातारा : कोणतेही गाव असो वा शहर एसटी बसस्थानक हे सार्वजनिक ठिकाण म्हणून ओळखले जाते. ‘आवो जावो घर तुम्हारा...’ अशी स्थिती असते. मात्र सातारा आगाराला वेगळाच अनुभव येत आहे. या ठिकाणी दोनशे कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, इतर प्रवासीच गाड्या लावत असल्याने आगारात दररोज सरासरी चारशे वाहने उभी केली जात होती. यावर उपाय काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना स्टिकर तयार केले आहे.पुणे-कोल्हापूर मार्गावर सातारा हे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे दररोज येऊन-जाऊन करणारे असंख्य सातारकर बसस्थानकात गाड्या उभ्या करुन जात असतात. मात्र, बसस्थानकात वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा नाही. इतरत्र लावलीच तर सातारा पोलिसांच्या वाहतूक शाखेतर्फे कारवाई केली जाते. वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई होते.कारवाई टाळण्यासाठी अनेक मंडळी क्लृप्त्या लढविल्या जातात. राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा आगारात किंवा विभागीय कार्यालयात कर्मचाऱ्यांची मैत्री करतात. त्यांना चहा-पाणी देऊन ‘मी आज गावाला चाललोय, आत गाडी लावतो. जरा लक्ष असू द्या,’ अशी गळ घातली जाते. एकदा गाडी लावली की पुढे वारंवार गाड्या लावल्या जातात. त्यामुळे कर्मचाऱ्यांपेक्षा प्रवाशांच्या गाड्या जास्त झाल्या आहेत, अशी अवस्था झाली होती.सातारा आगारात २६ जानेवारीला आयोजित कार्यक्रमाच्या वेळी आगारात गाड्यांच्या ताफा लागलेला होता. कार्यक्रमासाठी मोकळी जागा करायची होती. मात्र त्यांचे मालकच सापडले नाहीत. शेवटी कर्मचाऱ्यांनी उचलून दुसरीकडे ठेवले. त्यानंतर त्या गाड्या चार-पाच दिवस बेवारस स्थितीतच पडूनच होत्या. यावर सातारा आगाराने पर्याय काढला आहे. राज्य परिवहन महामंडळाचे बोधचिन्ह असलेले स्टिकर तयार केले असून कर्मचाऱ्यांच्या गाड्यांना लावण्यास दिले आहेत. हे स्टिकर असले तरच आत प्रवेश देण्याबाबत सुरक्षा रक्षकांना सूचना केल्या आहेत. त्यामुळे आगारात गेल्यानंतर स्टिकरवाल्याच गाड्या पहायला मिळत आहेत. (प्रतिनिधी)
अप्रिय घटनांना आळा बसणार
अनेक लोक ओळखीचा गैरफायदा घेऊन गाड्या लावतात. त्यामध्ये काही गाड्या महिनोंमहिने लावलेल्या असतात. त्यामुळे चोरीच्या गाड्या कोणत्या आहेत, तेही कळत नाही. काही लोक बेवारस गाड्यांवर लक्ष ठेवून त्यांना समाजविघातक कारवायांमध्ये वापर केला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सातारा आगाराने राबविलेला प्रयोग अनोखा असून कऱ्हाड आगारही हा प्रयोग करणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी
‘प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळ’ असे ब्रिदवाक्य घेऊन एसटी महामंडळ अनेक दशकांपासून सेवा बजावत आहे. एसटी महामंडळाचेच बोधचिन्ह या स्टिकरसाठी वापरले आहे. मात्र त्यावर ‘प्रवाशांच्या सोयीसाठी’ ऐवजी ‘कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी’ असा उल्लेख करण्यात आला आहे. कर्मचारीही अभिमानाने स्टिकर लावत आहेत.