सातारा: जूनपासून नवजाला सर्वाधिक २०० मिलिमीटर पाऊस, कोयना अन् महाबळेश्वरातही हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 11:56 AM2022-06-28T11:56:28+5:302022-06-28T11:57:01+5:30
सोमवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात १३.६० टीएमसी पाणीसाठा
सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरू असून काल, सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ३९, नवजाला ३१ तर महाबळेश्वरमध्ये २५ मिलिमीटर पाऊस पडला. दरम्यान, जूनपासून नवजाला सर्वाधिक २२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस दाखल होऊन १५ दिवस होऊन गेले आहेत. तरीही पावसाला म्हणावा असा जोर आलेला नाही. पश्चिम भागात पाऊस पडत असला तरी जोर नाही. तर पूर्व भागात कधीतरी पाऊस होत आहे. यामुळे पूर्वेकडे खरीप हंगामातील पेरणीला वेग आलेला नाही. शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. तर पश्चिम भागात पाऊस होत आहे. शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, गेल्या पाच दिवसांपासून पश्चिम भागात पाऊस होत आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ३९ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर जूनपासून आतापर्यंत कोयनानगर १९३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर नवजाला यावर्षी आतापर्यंत २२० आणि महाबळेश्वर येथे १८१ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात १३.६० टीएमसी पाणीसाठा होता. तर धरणाच्या पायथा वीजगृहातून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात होत होता. त्याचबरोबर पश्चिम भागातील धरणांतील पाणीसाठ्यात अजूनही वाढ झालेली नाही.
साताऱ्यात ढगाळ वातावरण...
सातारा शहर आणि परिसरात रविवारी रिमझिम स्वरुपात पाऊस पडला. तर सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. तसेच अधूनमधून अत्यल्प पाऊस होत होता. सातारा तालुक्यात काही ठिकाणी पेरणीची कामे सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.