सातारा जिल्ह्यात मतदान वाढीसाठी दोन हजार कर्मचारी एक लाख कुटुंबाच्या घरात..
By नितीन काळेल | Published: May 4, 2024 06:31 PM2024-05-04T18:31:36+5:302024-05-04T18:33:16+5:30
जिल्हा परिषदेकडून मतदारांत जागृती : गृहभेट कार्यक्रमात मतदारराजाला आवाहन
सातारा : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न सुरू असून शनिवारी मतदार गृहभेट कार्यक्रमा अंतर्गत जिल्हा परिषदेच्या दाेन हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांनी एक लाख कुटुबांना भेट दिली. यामाध्यमातून निवडणुकीत १०० टक्के मतदान होण्यासाठी जनजागृती करण्यात आली.
सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या जिल्हा नोडल अधिकारी याशनी नागराजन यांनी ४ मे रोजी मतदार गृहभेट दिवस राबविला. यासाठी जिल्हा परिषदेकडील सर्व अधिकारी, कर्मचारी आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये दोन हजार अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. या सर्वांनी मतदान जनजागृतीसाठी एक लाख कुटुंबाला भेट दिली. या भेटीत संबंधितांना मतदानाचे महत्व सांगण्यात आले. तसेच मतदारांना मतदानादिवशी काही अडचणी येऊ नये म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक कर्मचाऱ्यांना सूचनाही केली.
आैद्योगिक वसाहतीत १०० टक्के मतदानाचा नारा..
मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी मतदान जनजागृतीसाठी साताऱ्यातील आैद्योगिक वसाहतीतील कंपन्यांना भेट दिली. यावेळी कर्मचाऱ्यांना मतदानाचे महत्व सांगून सर्वांनी आपले कुटुंब आणि नातेवाईकांसह १०० टक्के मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले. तसेच सातारा स्वीप कक्षामार्फत कामगारांना मतदान जनजागृती पत्रकांचे वाटप करण्यात आले.
या जनजागृती कार्यक्रमावेळी सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, ग्रामपंचायतच्या अर्चना वाघमळे, महिला व बालकल्याणच्या रोहिणी ढवळे, सातारचे गटविकास अधिकारी सतीश बुध्दे, गटशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे, माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी तेजस गमरे यांच्यासह जिल्हा परिषदेच्या सर्व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नीलेश घुले यांनी उपस्थित कामगारांना मतदानाची शपथ दिली.