खंडाळ्यात एटीएम सेंटरवर बरसली लक्ष्मी; काढले दोन हजार, मिळाले साडेतीन, पैसे काढण्यासाठी लोकांच्या रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 11:45 AM2024-01-16T11:45:08+5:302024-01-16T11:47:31+5:30
बँक अधिकाऱ्यांना माहिती देऊनही व्यवहार सुरूच
खंडाळा (सातारा) : खंडाळा येथील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएमवर दोन हजार रुपयांपेक्षा अधिकची रक्कम काढल्यानंतर हजार ते दीड हजार रुपये अधिक रक्कम मिळत असल्याने अनेक ग्राहकांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे मकर संक्रांतीच्या सणाला एसबीआय बँकेचा सुपर धमाका सुरू असल्याची चर्चा ग्राहकांमध्ये होती.
खंडाळा शहरातील राजवलीबाबा चौकात भारतीय स्टेट बँकेचे एटीएम सेंटर आहे. या सेंटरमध्ये दोन एटीएम मशीन आहेत. मात्र, त्यातील एका मशीनवर दोन हजारांपेक्षा जास्त रक्कम एटीएम कार्डद्वारे काढल्यास प्रत्यक्षात तीन ते साडेतीन हजार रुपये हातात पडत होते. ही बाब ग्राहकांच्या लक्षात आल्यानंतर पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी एटीएमकडे धाव घेतली. एकाचवेळी दहा हजार काढले तरी एक ते दीड हजार जास्त मिळत होते. त्यामुळे ज्यांना दहा हजार काढायचे होते. त्यांनी दोन हजार पाचवेळा व्यवहार करून अधिकचे पैसे मिळविले.
वास्तविक जेवढी रक्कम काढली जात आहे तेवढीच रक्कम खात्यावरून कमी होत असल्याने ग्राहकांचे काहीच नुकसान नाही हे लक्षात आल्याने लोकांनी पैसे काढण्याचा धडाका सुरूच ठेवला. शहरात ही चर्चा फोनवरून एकमेकांना समजल्याने सर्वांनी पैसे काढण्यासाठी गर्दी केली. विशेषतः काहीजण स्वतःजवळ असणारे विविध एटीएम कार्ड घेऊन आले होते. काहीजण पैसे काढून तेथेच बंडल बनवून घेत होते. लोकांनी मात्र मकर संक्रांतीच्या दिवशी लक्ष्मी पावल्याचा आनंद घेतला.
बँक अधिकाऱ्यांना माहिती देऊनही व्यवहार सुरूच
शहरात ही बातमी पसरल्यावर काही सुज्ञ ग्राहकांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना फोन करून याबाबत कल्पना दिली. मात्र, बँकेची वेळ संपून गेल्यावर असा प्रकार घडल्याने पैसे काढणे सुरूच होते.