जिल्ह्यात नवे २०८३ रुग्ण; आणखी ३५ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:38 AM2021-05-24T04:38:27+5:302021-05-24T04:38:27+5:30
सातारा : जिल्ह्यात लॉकडाऊन करून आता दीड महिना झाला तरी बाधितांची संख्या काही कमी होत नाही. त्यामुळे प्रशासनाने आता ...
सातारा : जिल्ह्यात लॉकडाऊन करून आता दीड महिना झाला तरी बाधितांची संख्या काही कमी होत नाही. त्यामुळे प्रशासनाने आता सहा दिवसाचा अत्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे, असे असतानाच नव्या २०८३ रुग्णांची रविवारच्या अहवालामध्ये भर पडली. त्यामुळे जिल्हा प्रशासन अधिकच चिंतेत पडले.
राज्यभर कोरोनारने थैमान घातले असतानाच महाराष्ट्रातील जवळपास २४ जिल्ह्यांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या घटू लागली आहे. परंतु सातारा जिल्हा मात्र याला अपवाद आहे. रोजचे बाधितांचे दोन हजारांच्या वर आकडे येत आहेत. गत तीन दिवसांपूर्वी बाधितांची संख्या १३०० ते दीड हजारांपर्यंत येत होती. त्यामुळे आता कोरोना आटोक्यात आला आहे, अशी आशा आरोग्य विभाग बाळगत होते. मात्र अचानक रविवारी २०८३ नवे रुग्ण आणि ३५ बाजी त्यांचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाच्या आशेवर पाणी पडले.
जिल्ह्यातील सातारा, फलटण आणि कराड हे तीन तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहेत. सातारा तालुक्यात ३७६, फलटण ३६४, कराड तालुक्यात २४३ नवे रुग्ण अरुण आले आहेत. त्याचबरोबर रविवारी जिल्ह्यात ३५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये खटाव ७, सातारा ६ , कराड ६, वाई ३ , जावली २ , खंडाळा २, कोरेगाव ३, माण १, महाबळेश्वर ०, पाटण ५, तर फलटण तालुक्यामध्ये एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नाही. त्यामुळे प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४८ हजार ३३९ जण कोरोनाबाधित आढळून आले असून, ३ हजार ४२५ जणांचा बळी घेतला आहे. तसेच कोरोना मुक्तीचे प्रमाणही चांगले असून, रविवारी ११९८ जण तर आतापर्यंत १ लाख २६ हजार ६३१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या १८ हजार ६७३ कोरोनाबाधित रुग्ण असून, त्यांच्यावर विविध ठिकाणी कोरोना सेंटर आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत.