विजय पाटीलसह २१ एजंट अटकेत
By admin | Published: February 5, 2017 01:04 AM2017-02-05T01:04:12+5:302017-02-05T01:04:12+5:30
साकोली कॉर्नर येथे मटकाबुकीवर छापा : पाच लाखांसह ३१ मोबाईल; दुचाकी जप्त
कोल्हापूर : शहराच्या मध्यवस्तीत रंकाळा बसस्थानकाच्या पिछाडीस असलेल्या केदार प्लाझा इमारतीमध्ये मटका बुकीवर शनिवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून मटकाकिंग विजय लहू पाटील, अजित बागलसह २१ एजंटांना अटक केली. त्यांच्याकडून सुमारे पाच लाखांसह दुचाकी गाड्या, मटक्याच्या चिठ्ठ्यांची दहा पोती जप्त केली.
संशयित विजय पाटील, अजित बागल यांच्यावर यापूर्वी पोलिस दप्तरी मटकाप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. मध्यंतरीच्या काळात मटका कारवाया तुरळक प्रमाणात होत्या; पण, शनिवारच्या या मोठ्या कारवाईने पुन्हा एकदा डोके वर काढल्याचे स्पष्ट झाले.
साकोली कॉर्नर येथे केदार प्लाझा इमारत आहे. त्याच्या दुसऱ्या मजल्यावर एका फ्लॅटमध्ये संशयित विजय पाटील, अजित बागल यांना एजंट लोक रोज या ठिकाणी मटक्याच्या कलेक्शनचे पैसे आणून देतात. शनिवारी हे सर्वजण मटक्याचे पैसे जमा करण्यासाठी आले होते. तसेच या फ्लॅटमध्ये मटक्याच्या चिठ्ठ्याही होत्या. रात्री अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांचे पथक व जुना राजवाडा पोलिसांनी विजय पाटीलच्या या मटकाबुकीवर छापा टाकला.
यावेळी फ्लॅटमध्ये विजय पाटीलसह सर्व एजंट पैसे मोजत बसले होते. यामध्ये नव्या पाचशे, दोन हजार रुपयांच्या नोटांसह शंभर, पन्नास अशा स्वरूपाच्या चलनी नोटा होत्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या. त्यानंतर पैसे मोजण्यास सुरुवात केली. सुमारे दोन ते अडीच तास पोलिस पैसे मोजत होते. रात्री उशिरापर्यंत कारवाईचे (पान १० वर)
माजी नगरसेवक मूळ बुकीमालक ?
विजय पाटील आणि अजित बागल हे मटकाकिंग जरी या कारवाईत अटक झाले असले तरीही, या बुकीच्या पडद्यामागे राहून हालचाली करणारा मूळचा मालक हा शिवाजी पेठेतील एक माजी नगरसेवक असल्याची चर्चा या परिसरात होती. तो मालक नेहमीच पडद्यामागे असून, राजकीय वलयाखाली वावरत आहे. यापूर्वी त्याच्यावर क्वचितच मटकाप्रकरणी कारवाई झाली आहे. त्यामुळे या मूळ मालकाच्या मागावर रात्री उशिरा पोलिसांचे पथक गेल्याचे समजते.
दहा पोती चिठ्ठ्या सापडल्या
संपूर्ण जिल्ह्यातील मटका एजंट एकावेळी पैसे कलेक्शनसाठी एकत्र जमा झाले होते. या कारवाईत सुमारे दहा पोती मटक्यांच्या चिठ्ठ्या पोलिसांच्या हाती लागल्या. पोलिसांनी प्राथमिक कारवाईत सुमारे ५ लाख रुपये जप्त केल्याचे सांगितले असले तरी रात्री उशिरापर्यंत या पैशाची मोजदाद करण्याचे काम सुरू होते. त्यामुळे ही जप्त केलेली रक्कम किमान १५ लाखांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.