नऊ महिन्यांत सांगलीसाठी २१ टीएमसी पाणी
By admin | Published: February 18, 2015 10:35 PM2015-02-18T22:35:52+5:302015-02-18T23:47:13+5:30
कोयनेत समाधानकारक पाणीसाठा : १८७४ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती; सध्या ८० टक्के पाणीसाठा शिल्लक
अरुण पवार - पाटण -जलविद्युत निर्मितीचा अखंड स्त्रोत असणाऱ्या कोयना धरणातील पाण्यावर एक जुलैपासून आजअखेरच्या नऊ महिन्यांमध्ये एकूण १८७४ दशलक्ष युनीट वीजनिर्मिती करण्यात आली आहे. सध्या शिवसागर जलाशयात ७७. ३३ टीएमसी इतका समाधानकारक पाणीसाठा शिल्लक आहे. कोयना धरणातील ३९.३२ टीएमसी पाणीवापर वीजनिर्मितीसाठी तर सांगलीकडील पाण्याची गरज भागविण्यासाठी २१ टीएमसी पाणी सोडण्यात आले. उन्हाळ्याच्या झळा सुरू झाल्या की पाणीटंचाईची भीती आणि विजेच्या लोडशेडिंगचे भूत मानगुटीवर बसते. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वांच्या नजरा आपोपच सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाकडे जातात. म्हणूनच कोयना धरणाची काय स्थिती आहे, हे वरचेवर जाणून घ्यावे लागते.
कोयना धरण १०५. २५ टीएमसी पाणीक्षमता असणारे आहे. दिवसाला १९६० मेगावॅट वीजनिर्मिती करण्याची क्षमता या प्रकल्पात आहेत. त्यासठी पोफळी येथे टप्पा क्रमांक १ आणि २ अलोरे व नवजा येथील चौथा टप्पामधून वीजनिर्मितीसाठी विद्युत जनित्रे पाण्यावर फिरविली जातात. दि. १ जून ते ३१ मे असे कोयना धरणातील पाण्याचे तांत्रिक नियोजन असते. त्यानुसार आजअखेर पोफळी १ व २ टप्पामधून ७५०. ४६ तसेच अलोरे येथून ३६५. १०, टप्पा क्र. ४ मधून ७०२. ९२ आण पायथा वीजगृहातून ५५. ८१ अशी एकूण १८७४ दशलक्ष युनीट वीजनिर्मिती आजअखेर करण्यात आली आहे. त्यासाठी ३९. ३२ टीएमसी पाणीवापर झाला आहे. गतवर्षी याचदिवशी कोयना धरणात ५९.३३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. तर सध्या तो ७७.३३ टीएमसी इतका आहे. पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून सांगलीकडे पाणी सोडले जाते. तर अलोरे व पोफळी वीजगृहातील पाणी कोळकेवाडी धरणात साठवून चिपळूणकडे सोडले जाते. गतवर्षी कोयना धरणातील वीजनिर्मितीसाठीचा पाणीवापर ८० टीएमसी पर्यंत गेल्यामुळे एप्रिल-मेमध्ये धरणात न भूतो न भविष्याती असा खडखडाट झाला होता. त्यामुळे यंदा तसे होणार नाही. याची दक्षता घेण्यात आल्याचे शिल्लक पाणीसाठा ७७. ३३ टीएमसी वरून लक्षात येते.
पाण्याचा पूर्णक्षमतेने वापर ...
मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांचा काळ कोयना धरणासाठी काळ बनूनच येतो. कारण सांगलीकडे पाणी मागणी वाढते तर वीजनिर्मितीची तहान देखील अधिक तीव्र होते. त्यामुळे कोयना धरणातील पाण्याचा वापर झपाट्याने होतो. येत्या १ जूनपर्यंत कोयना धरणातील पाण्याचा पुरेपूर वापर व्हावाच, अशी अपेक्षा असते. कारण त्यानंतर पावसाळा सुरू होतो. तेव्हा त्याअगोदर पूर्णक्षमतेने पाणीवापर झालाच पाहिजे.
सध्या कोयना धरणातील पाण्याची स्थिती समाधानकारक आहे. सध्या असणारा ७७. ३३ टीएमसी पाणीसाठा हा आगामी काळासाठी करण्यात येणाऱ्या वीजनिर्मितीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी शेती सिंचनासाठी शाश्वत ठरणारा आहे.
- व्ही. एस. तोंडले, शाखा अभियंता