जिल्ह्यातील २१ गावे अन् २८ वाड्या तहानल्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:39 AM2021-05-26T04:39:05+5:302021-05-26T04:39:05+5:30

सातारा : जिल्ह्यात सलग दोन वर्षे दमदार पाऊस झाला. तसेच जलसंधारणाच्या कामामुळे पाणीसाठे टिकून राहत असल्याने यंदा मार्च महिन्याच्या ...

21 villages and 28 farms in the district are thirsty. | जिल्ह्यातील २१ गावे अन् २८ वाड्या तहानल्या..

जिल्ह्यातील २१ गावे अन् २८ वाड्या तहानल्या..

Next

सातारा : जिल्ह्यात सलग दोन वर्षे दमदार पाऊस झाला. तसेच जलसंधारणाच्या कामामुळे पाणीसाठे टिकून राहत असल्याने यंदा मार्च महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात टँकर सुरू झाला. मात्र, सध्या टंचाई वाढू लागली असून, २१ गावे आणि २८ वाड्यांसाठी पाणीपुरवठा सुरू आहे, तर १८ हजार नागरिक आणि ५ हजारांवर पशुधन टँकरवर अवलंबून आहे.

जिल्ह्यात तीन-चार वर्षांतून दुष्काळ पडतो. त्यातच पाऊस होऊनही माण, खटावसारख्या तालुक्यांत डिसेंबर, जानेवारी महिना उजाडताच टँकर सुरू करावे लागायचे; पण गेल्या काही वर्षांत हे चित्र बदलले आहे. याला कारण म्हणजे जलसंधारणाची झालेली कामे. त्याचबरोबर वॉटर कप स्पर्धेमुळे तर पाणी साठवण्याचं तुफान आलेलं. माण, खटाव आणि कोरेगाव या तालुक्यांत जलसंधारणाची मोठी कामे झाली आहेत. त्यामुळे पावसाचं पडलेलं पाणी अडून राहिलं व त्याचा फायदाही टंचाई निवारणासाठी झाला आहे.

जिल्ह्यात दोन वर्षांपासून दमदार पाऊस होत आहे. २०१९ आणि २०२० या दोन वर्षांत सरासरीहून अधिक पाऊस झाला. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात टंचाईची स्थिती एकदम कमी राहणार असल्याचे समोर आले होते. याबाबत जिल्हा प्रशासनाने संभाव्य टंचाई आराखडा तयार केला होता. त्यानुसार ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यातील १६९ गावांना आणि २२६ वाड्यात टंचाई भासू शकते; पण यामधील १३८ गावांनाच टंचाईचा सामना करावा लागण्याचा अंदाज होता. त्यासाठी ४६ टँकर लागू शकतात, असे अनुमान होते. त्यासाठी जवळपास अडीच कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र, उन्हाळा संपत आला तरी अजूनही मोठ्या प्रमाणात टँकर सुरू नाहीत. सध्या २१ गावे आणि २८ वाड्यांसाठीच टँकर सुरू आहेत. या टँकरवर १८१५३ नागरिक आणि ५४८९ पशुधन अवलंबून आहे, तर १७ टँकर सुरू आहेत. यामध्ये माण तालुक्यात टंचाईची स्थिती अधिक आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या मध्यावर जिल्ह्यातील पहिला टँकर खटाव तालुक्यात सुरू झाला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर तालुक्यांत टंचाई निवारणासाठी उपाययोजना राबविण्यात आल्या. मात्र, यावर्षी गेल्यावर्षीच्या तुलनेत टँकर उशिरा सुरू झाला आहे. वाई तालुक्यात टँकर प्रथम सुरू झाला. आता सहा तालुक्यांत टँकर सुरू आहे. लवकरच आणखी काही गावांत टंचाई भासू शकते.

चौकट :

माणमध्ये ९ गावे अन् १६ वाड्यांसाठी टँकर...

माण तालुक्यात टंचाईग्रस्त गावे वाढू लागली आहेत. सध्या ९ गावे आणि १६ वाड्यांसाठी ५ टँकर सुरू आहेत. यावर ६८९४ नागरिक अवलंबून आहेत, तर वाई तालुक्यातील ३ गावे आणि ५ वाड्यांसाठी ३ टँकर सुरू आहेत. यावर ३६२६ नागरिक आणि १४८० पशुधन अवलंबून आहे. पाटण तालुक्यातील आंब्रूळकरवाडी (भोसगाव), चव्हाणवाडी, नाणेगाव येथे टँकर सुरू आहेत. येथे एका टँकरद्वारे १२१३ नागरिक व ४५७ पशुधनाला पाणीपुरवठा सुरू आहे. त्याचबरोबर कऱ्हाड तालुक्यात चार गावांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. वानरवाडी बामणवाडी, गोसावेवाडी, गायकवाडवाडीसाठी ३ टँकर सुरू आहेत. खटाव तालुक्यात २ गावे आणि एका वाडीसाठी एकच टँकर सुरू झालेला आहे. महाबळेश्वर तालुक्यातही २ गावांत टंचाई आहे.

...........................................................

Web Title: 21 villages and 28 farms in the district are thirsty.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.