सातारा जिल्ह्यात २३ कोरोनाबाधितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:27 AM2021-06-25T04:27:53+5:302021-06-25T04:27:53+5:30
सातारा : जिल्ह्यात गुरुवारी ८७९ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आला असून २३ बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील बाधितांची संख्या दिवसेंदिवस पुन्हा ...
सातारा : जिल्ह्यात गुरुवारी ८७९ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आला असून २३ बाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील बाधितांची संख्या दिवसेंदिवस पुन्हा वाढत असून मृत्यूदेखील वाढले असल्याने सातारा जिल्ह्यावर चिंतेचे सावट पसरले आहे.
जिल्ह्यात गुरुवारी २३ जण मृत्युमुखी पडले, त्यामध्ये सातारा आणि कऱ्हाड तालुक्यातील प्रत्येकी ९ रुग्णांचा समावेश आहे. या दोन्ही तालुक्यांमधील रुग्णसंख्यादेखील कमी होत नसल्याचे चित्र असून कऱ्हाड तालुक्यात २६६ तर सातारा तालुक्यात १७० नवे रुग्ण बाधित आढळून आले आहेत. पाटणसारख्या दुर्गम तालुक्यातदेखील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र असून गुरुवारी पाटणमध्ये ६५ रुग्ण आढळून आले आहेत.
प्रशासनाच्यावतीने तपासण्या वाढविण्यात आल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी विशेष मोहीम राबवून तपासण्या करण्यात येत आहेत. सोमवार दि. २१ रोजी ४५१ इतके रुग्णाला सापडले होते. रुग्णसंख्या कमी झाल्याने दिलेला दिलासा मिळाल्याचे चित्र निर्माण झाले होते, मात्र, पुन्हा संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागल्याने चिंतेत भर पडली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नियमांमध्ये शिथिलता देऊन दुकानांच्या वेळा वाढविल्या आहेत. ही संधी साधून जिल्ह्यातील बाजारपेठांमध्ये लोक मोठ्या संख्येने गर्दी करत असल्याने रुग्णसंख्या कमी होत नाही.
जावली, महाबळेश्वर हे तालुकेवगळता इतर तालुक्यांमध्ये अजूनही रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. महाबळेश्वरमधील पर्यटनस्थळ बंद ठेवण्यात आले असले तरी हॉटेल व्यवसाय सुरू करण्यात आले आहेत. या तालुक्यात पर्यटकांची रेलचेल सुरू झाली असल्याने हा तालुका देखील रुग्णसंख्येत बाधित होऊ शकतो त्यामुळे प्रशासनाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
जावली, खंडाळा, माण महाबळेश्वर, वाई या तालुक्यात गुरुवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही; परंतु इतर तालुक्यांमध्ये मात्र बाधितांचे मृत्युसत्र सुरूच आहे.
जिल्ह्यामध्ये एकूण ४ हजार २७८ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या गुरुवारी संध्याकाळपर्यंत ७४८ जणांना घरी सोडण्यात आले तर ८ हजार ७२४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
चौकट
पावणे दोन लाख रुग्ण झाले बरे
जिल्ह्यात आतापर्यंत १० लाख २२ हजार ६०८ लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या त्यातून १ लाख ८८ हजार ७६९ लोक कोरोनाबाधित आढळले. त्यातील १ लाख ७६ हजार ६१३ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले.