सातारा जिल्ह्यात २३ बाधितांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:44 AM2021-07-14T04:44:15+5:302021-07-14T04:44:15+5:30
सातारा : जिल्ह्यात २३ कोरोना बाधितांना सोमवारी जीव गमवावा लागला. ८१४ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून, जिल्हा प्रशासनाच्या वतीने ...
सातारा : जिल्ह्यात २३ कोरोना बाधितांना सोमवारी जीव गमवावा लागला. ८१४ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून, जिल्हा प्रशासनाच्या वतीने चाचण्यांची संख्या वाढविल्याने जिल्ह्यात रुग्णांची संख्यादेखील वाढलेली दिसत आहे.
जिल्ह्यातील मृत्यूमुखी पडलेल्या बाधित यांची संख्या ५ हजाराकडे वाटचाल करताना पाहायला मिळते. मंगळवारी अचानकपणे मृत्यूची संख्या वाढली. तब्बल २३ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. जिल्ह्यातील एकूण मृत्यूची संख्या ४ हजार ९४० झाली असून, रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणदेखील पुन्हा वाढल्याचे चित्र असून, आरोग्य यंत्रणा चिंतेत पडली आहे. कऱ्हाड, सातारा, फलटण या तालुक्यांमध्ये रुग्णांचे मृत्यू वाढले. सातारा तालुक्यात ६, कऱ्हाडात ५, फलटणमध्ये ४, खंडाळा, खटाव, महाबळेश्वर, पाटण या तालुक्यात प्रत्येकी १, कोरेगाव व माण तालुक्यातील प्रत्येकी २ जणांचा मृत्यू झाला. जावळी व वाई या तालुक्यात मृत्यूची नोंद झाली नाही. सातारा तालुक्यात सर्वाधिक १ हजार २६० मृत्यू झाले. त्याखालोखाल कऱ्हाड तालुक्यात ९२५ रुग्णांना जीव गमवावा लागला आहे.
कऱ्हाड तालुक्यातील रुग्णांची संख्या मंगळवारी पुन्हा वाढली. तालुक्यातील ३१६ रुग्ण बाधित आढळून आले आहेत. त्याखालोखाल सातारा तालुक्यातील १७१ रुग्ण आढळून आले असून, फलटण, कोरेगाव या तालुक्यात रुग्णसंख्या वाढलेली आहे. जिल्ह्यातील रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४ हजार ४२७ इतकी झालेली आहे.
सातारा तालुक्यामध्ये सर्वाधिक ४२ हजार ४६५ इतकी रुग्णसंख्या झालेली आहे. कऱ्हाड तालुक्यातील रुग्णसंख्या कमी वेळेत झपाट्याने वाढली. या तालुक्यातील रुग्णांची एकूण संख्या ३१ हजार १९३ झाली आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या मंगळवारी संध्याकाळपर्यंत ६७६ जणांना घरी सोडण्यात आले. विविध रुग्णालयांमध्ये १० हजार ५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
१२ लाखांच्यावर लोकांचे नमुने तपासले
सातारा जिल्ह्यामध्ये १२ लाख १ हजार ५०७ लोकांचे नमुने तपासण्यात आले, यातून २ लाख ४ हजार ४२७ लोक बाधित आढळले आहेत. कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाणदेखील जास्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ९१ हजार १५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोना वाढीचा दर ७ टक्क्यावर..
जिल्ह्यात दोन दिवसापासून कोरोना वाढीचा दर अचानकपणे खाली आला. साडेसोळा टक्क्यावर पोहोचलेला वाढीचा दर दोन दिवसात साडेसहा टक्क्यावर आला होता. मंगळवारी पुन्हा थोडी वाढ झाली. कोरोना वाढीचा दर सात टक्के झाला.