पुसेगाव कोविड सेंटरला चोवीस तास अखंडित वीजपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:33 AM2021-05-03T04:33:05+5:302021-05-03T04:33:05+5:30
पुसेगाव : खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील सुमारे ४२ गावांतील कोरोना रुग्णांसाठी पुसेगाव येथे सुरू असलेले कोविड सेंटर ...
पुसेगाव : खटाव तालुक्याच्या उत्तर भागातील सुमारे ४२ गावांतील कोरोना रुग्णांसाठी पुसेगाव येथे सुरू असलेले कोविड सेंटर समस्यांच्या जाळ्यात अडकले होते. वीज वितरण कंपनीच्या सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे व्हेंटिलेटरवरील, तसेच ऑक्सिजनवर उपचार घेत असलेल्या रुग्णांचा जीव टांगणीला लागत होता. या बाबींची आमदार शशिकांत शिंदे यांनी गांभीर्याने दखल घेत, पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला कायमस्वरूपी २० केव्ही क्षमतेचा जनरेटर स्वखर्चातून भेट दिला.
यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, सरपंच विजय मसणे, तलाठी गणेश बोबडे, ग्रामपंचायत सदस्य गणेश जाधव, प्रवीण देवकर, ज्ञानेश्वर कुंभार आदी उपस्थित होते.
येथील कोविड केअर सेंटरमध्ये ७० रुग्णांची उपचारासाठी क्षमता आहे. दरम्यान, श्वसनाचा त्रास असलेल्या काही कोरोनाबाधित रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवावे लागते, तर गंभीर स्थितीत असलेल्या काही रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजन पुरवावा लागतो. तशी व्यवस्थाही या रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात आहे. मात्र, येथे जनरेटरची सोय नसल्याने वीजपुरवठा खंडित होऊन उपचार आवश्यक असलेल्या अतिदक्षता विभागातील रुग्णांच्या जिवाशी खेळ होत असल्याच्या घटना घडत होत्या. तसेच रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्यास कोविड सेंटरमधील रुग्णांना अंधारासोबतच उकाड्याचा त्रास देखील सहन करावा लागत होता. मात्र, आता आमदार शशिकांत शिंदे यांनी स्वखर्चातून हा जनरेटर दिल्याने येथे कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
कोट..
गतवर्षी या भागातील प्राथमिक शिक्षकांनी या आरोग्य केंद्राला कॉन्सनट्रेटेड ऑक्सिजन मशीन भेट दिल्या होत्या. त्याच्या मदतीने आतापर्यंत उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यास रुग्णालय प्रशासनाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. आरोग्य केंद्रास जनरेटर उपलब्ध केल्याने तातडीने उपचार आवश्यक असलेल्या रुग्णांची आता गैरसोय टळणार आहे.
- डॉ. आदित्य गुजर, वैद्यकीय अधिकारी, पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र
कोट..
काही तांत्रिक अडचणीमुळे येथील वीजपुरवठा खंडित होऊन केवळ जनरेटरअभावी कोरोना सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांचे व त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे फार हाल होत होते. आ. शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून कायमस्वरूपी जनरेटरची सोय केल्याने आरोग्य विभागासोबतच परिसरातील रुग्णांची काळजी मिटली आहे.
- गणेश बोबडे, तलाठी
०२पुसेगाव
पुसेगाव (ता. खटाव) पुसेगाव कोविड सेंटर येथे कायमस्वरूपी जनरेटरची सोय करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, गणेश जाधव, तलाठी बोबडे व इतर. (छाया : केशव जाधव)