सातारा जिल्हा परिषद नोकर भरती; २४४ उमेदवारांना नियुक्ती
By नितीन काळेल | Published: September 25, 2024 07:24 PM2024-09-25T19:24:12+5:302024-09-25T19:24:23+5:30
आतापर्यंत १६ संवर्गांत निवड : ९७२ जागा भरणार, कामाचा ताण कमी होणार
सातारा : सातारा जिल्हा परिषदेतील विविध २१ संवर्गांतील ९७२ पदांसाठी परीक्षा झाली असून, आतापर्यंत १६ संवर्गांतील २४४ उमेदवारांना समुपदेशनाने नियुक्ती देण्यात आलेली आहे. उर्वरित संवर्गांतीलही पात्र उमेदवारांना लवकरच नियुक्ती मिळणार असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होणार आहे.
सातारा जिल्हा परिषदेकडील विविध २१ संवर्गांत ९७२ पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी ७४ हजार ५७८ उमेदवारांनी अर्ज केला होता. त्यानंतर गेल्या वर्षी १५ ऑक्टोबरपासून ऑनलाइन पद्धतीने सर्व २१ संवर्गांसाठी परीक्षा झाली. त्यानंतर निकालही प्राप्त झाला आहे. तर यामधील १६ संवर्गांतील उमेदवारांना जिल्हा परिषदेच्या वतीने समुपदेशनाने पदस्थापना आणि नियुक्ती आदेश दिला आहे. आता ६ संवर्गाची प्रक्रिया राहिलेली आहे.
उर्वरित संवर्गांत आरोग्यसेवक पुरुष ४० टक्के, कंत्राटी ग्रामसेवक यामधील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झालेली आहे. नियुक्ती आदेश कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. कनिष्ठ लेखाधिकारी, आरोग्यसेवक (महिला), आरोग्यसेवक (पुरुष) ५० टक्के अशा तीन संवर्गांतील कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया झालेली आहे. अंतिम निवड यादीबाबत शासनस्तरावरून मार्गदर्शन मागविण्यात आलेले आहे.
सातारा जिल्हा परिषदेतील २१ संवर्गांतील ९७२ जागांसाठी पदभरती सुरू आहे. आतापर्यंत १६ संवर्गांतील उमेदवारांना जिल्हा परिषदेकडून समुपदेशनाने नियुक्ती आदेश देण्यात आलेला आहे. उर्वरित संवर्गांतीलही पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही सुरू आहे. - याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी