माजगावात बिबट्याच्या हल्यात २४५ देशी कोंबड्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:39 AM2021-05-18T04:39:55+5:302021-05-18T04:39:55+5:30
चाफळ : पाळीव देशी कोंबड्यांच्या शेडवर डल्ला मारत २४५ कोंबड्यांचा दोन बिबट्यांनी अवघ्या तीन तासांत फडशा पाडल्याची घटना विभागातील ...
चाफळ : पाळीव देशी कोंबड्यांच्या शेडवर डल्ला मारत २४५ कोंबड्यांचा दोन बिबट्यांनी अवघ्या तीन तासांत फडशा पाडल्याची घटना विभागातील माजगांव ता. पाटण येथे घडली. विक्रम महिपाल असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करत, संबंधित शेतकऱ्यास नुकसान भरपाई देण्याची मागणी माजगांवचे सरपंच प्रमोद पाटील यांनी केली आहे.
चाफळसह परिसरातील गावागावांत बिबट्याचा वावर नित्याचाच ठरला आहे. वारंवार मानवी वस्तीत घुसून पाळीव जनावरांना बिबट्या भक्ष्य करू लागला आहे. यात मात्र शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे अगोदरच अडचणी सापडलेला बळीराजा कधी अतिवृष्टीला तर कधी पशुधन धोक्यात आल्याने मेटाकुटीला आला आहे. माजगांव, चाफळसह परिसरात गत काही महिन्यांपासून बिबट्या सतत शेतकऱ्यांच्या नजरेस पडू लागला आहे. गत काही दिवसांपूर्वी चाफळ येथील लक्ष्मीनगरमध्ये थेट मानवी वस्तीत प्रवेश करत जनावरांच्या शेडमध्ये घुसून बिबट्याने शेळी ठार मारली होती.
या घटनेनंतर बिबट्याने माजगांव येथील राममळा नावाच्या शिवारातील विक्रम महिपाल यांच्या देशी कोंबड्यांच्या शेडवर आपल्या साथीदारासोबत हल्ला चढवत शेडमधील २४५ कोंबड्यांचा चुराडा केला, तर २२ कोंबड्या जखमी अवस्थेत इतरस्त्र आढळून आल्या. यात महिपाल यांचे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे सलून व्यवसाय बंद असल्याने महिपाल यांनी कर्जे काढून आपल्या राममळा शिवारातील शेतामध्ये शेड उभारून देशी कोंबड्यांचा व्यवसाय सुरू केला होता. व्यवसाय थाटला खरा, पण बिबट्याने तो थोड्याच दिवसांत मोडून काढल्याने महिपाल यांच्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. वनविभागाने घटनेचा पंचनामा करून महिपाल यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी महिपाल यांच्यासह माजगांवचे सरपंच प्रमोद पाटील यांनी केली आहे.
कोट
महिपाल यांना मदत मिळवून देण्याचे वनविभागाचे आश्वासन
विक्रम महिपाल यांनी नातेवाईक व मित्रमंडळीकडून पैसे उसने घेऊन शेतात शेड उभारून देशी कोंबड्यांचा व्यवसाय सुरू केला होता. २६७ कोंबड्या या शेडमध्ये होत्या. यातील २४५ कोंबड्या या हल्यात मारल्या गेल्यात. या घटनेची माहिती वनविभागास माजगांवचे सरपंच प्रमोद पाटील व महिपाल यांनी दिल्यानंतर, वनरक्षक विलास वाघमारे यांनी सदर घटनेचा पंचनामा करत महिपाल यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.