जिंतीत कोरोनामुळे ३१ दिवसांत २५ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:37 AM2021-05-15T04:37:57+5:302021-05-15T04:37:57+5:30
जिंती : फलटण तालुक्यातील जिंतीमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने गावामध्ये रोज एकतरी मृत्यू होत आहे. यामुळे गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण ...
जिंती : फलटण तालुक्यातील जिंतीमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने गावामध्ये रोज एकतरी मृत्यू होत आहे. यामुळे गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या ३१ दिवसांमध्ये २५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. प्रशासकीय यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्यानेच गावामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, अशी चर्चा ग्रामस्थांत आहे.
कोरोनाला अटकाव करण्यासाठी विषेश मोहीम हाती घेण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. गावामध्ये ग्रामपंचायत सरपंच, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. लाॅकडाऊन नावाला केले आहे. कोणत्याही प्रकारचे नियम न पाळता कोणीही कुठूनही गावामध्ये येत असल्याने कोरोना रुग्णांत भर पडत आहे. दरम्यान, जिंती गावामध्ये रोज एकतरी मृत्यू होत असल्याने गावामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे. गावातील कोरोना कमिटी फक्त नावापुरती असून आशा, अंगणवाडी सेविका यांच्यावर दबाव आणला जातो. पण, गावातील ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील, तलाठी, कोतवाल बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे गावाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे तालुका प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जिंतीमध्ये योग्य पद्धतीने मोहीम हाती घ्यावी अन्यथा मृत्यू संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.