सातारा : तलावातील अल्पसाठ्याने घशाला कोरड पडणार , नेर तलावात २५ टक्के साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 05:43 PM2018-10-06T17:43:18+5:302018-10-06T17:48:11+5:30
खटाव तालुक्यातील अनेक भागांना पावसाने चांगलीच हुलकावणी दिली आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. तर तालुक्यातील अनेक गावांसाठी वरदान ठरणाऱ्या नेर तलावात केवळ २५ टक्के साठा उपलब्ध आहे.
पुसेगाव : खटाव तालुक्यातील अनेक भागांना पावसाने चांगलीच हुलकावणी दिली आहे. त्यामुळे भविष्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. तर तालुक्यातील अनेक गावांसाठी वरदान ठरणाऱ्या नेर तलावात केवळ २५ टक्के साठा उपलब्ध आहे. येळीव, शिरसवडी या दोन तलावांत तर नाममात्र साठा आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण होणार आहे. सध्या फक्त हस्त नक्षत्रातील पावसाकडे शेतकऱ्यांसह लोकांच्या नजरा लागल्या आहेत.
खटाव तालुक्यात यावर्षी उन्हाळ्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. त्यामुळे तालुक्यातील तलावांमध्ये चांगला पाणीसाठा होऊ शकला नाही. परिणामी, या तलावातील पाण्यावर अवलंबून असणारे शेती क्षेत्र तसेच गावोगावच्या पाणी योजना अडचणीत येऊ शकतात. डिस्कळ, मोळ, बुध, ललगुण तसेच राजापूर, वेटणे, रणसिंगवाडी या भागात मोठा पाऊस झाला तरच येणाºया पुरामुळे तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असते.
यावर्षी खटाव तालुक्यातील तलाव परिसरात तुलनेने मोठ्या स्वरुपातील व वळीव पाऊस कमी पडला. तसेच तलावाच्या वरील भागात मोठ्या प्रमाणात जलसंधारण, जलयुक्त शिवार व वॉटर कपच्या माध्यमातून मोठी कामे झाली आहेत. त्यामुळे नेर व दरुज तलावात आजमितीला केवळ अल्प पाणीसाठा आहे.
अपवाद वगळता काही भागात हलका पाऊस होत असला तरीही तलावात पाणीसाठा होण्यासाठी दमदार पावसाची नितांत गरज आहे. तर सध्याच्या हस्त नक्षत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेर तलावातून पुसेगाव, विसापूर, फडतरवाडी, शिंपीमळा, बुध, डिस्कळ, वेटणे यासह अनेक गावांच्या पिण्याच्या पाणी योजना कार्यान्वित आहेत. परंतु आजमितीच्या उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करता या भागातील जनतेला पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न भेडसावण्याची शक्यता आहे.
नेर तलाव १८८६ मध्ये पूर्ण झाला असून, पाणीसाठवण क्षमता ११.८७ दशलक्ष घन मीटर (४१६.४० दशलक्ष घनफूट) ऐवढी आहे. ६५० हेक्टर जमीन क्षेत्रात हा तलाव आहे.
या तलावाचे उद्घाटन राणी व्हिक्टोरिया यांच्या हस्ते झाले होते. पुसेगाव, खटाव, कुरोली सिद्धेश्वरसह येरळवाडीपर्यंच्या जनतेसाठी महत्त्वाचा असलेला हा तलाव तालुक्याच्या ६० टक्के भागाला वरदान ठरलेला आहे.
तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर या पाण्यावर खरीप व रब्बी हंगामातील एक हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र ओलिताखाली येते. मात्र, चालूवर्षी समाधानकारक पाणीसाठा अद्यापही न झाल्याने शेतकरी वर्गात चिंता आहे.
खटाव तालुक्यातील तलावांची पाणीसाठवण क्षमता व उपलब्ध पाणीसाठा असा
तलाव पाणीसाठवण क्षमता उपलब्ध पाणीसाठा (दशलक्ष घनफुटात)
नेर ४१६.४० १२५.१
दरूज १०१.८८३ १८.0
येळीव ७९.९७ अल्पसाठा
शिरसवडी ६८.१३ अल्पसाठा
मायणी ५१.४५ मृतसाठा
कानकात्रेवाडी ४३.०८ मृतसाठा
सातेवाडी ३७.३७ मृतसाठा
डांबेवाडी २७.२२४ मृतसाठा
पारगाव ३८.४७ मृतसाठा