जिल्ह्यात २६०० पोलिसांचा बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:43 AM2021-05-25T04:43:50+5:302021-05-25T04:43:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात आज, मंगळवारपासून सुरू होणाऱ्या सहा दिवसांच्या लॉकडाऊनसाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले असून, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यात आज, मंगळवारपासून सुरू होणाऱ्या सहा दिवसांच्या लॉकडाऊनसाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले असून, जिल्ह्यात ४६ ठिकाणी तपासणी केंद्रे उभारण्यात आली आहेत, तर दोन हजार ६०० पोलिसांचा खडा पहारा रस्त्यावर असणार आहे. जे कोणी विनाकारण रस्त्यावर फिरतील, त्यांना वेळ पडल्यास फटकेसुद्धा खावे लागणार आहेत, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. या कडक लॉकडाऊनचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस दलामध्ये गत काही महिन्यांपासून कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या वाढत असली तरी पोलिसांनी कामामध्ये कुठेही हलगर्जीपणा केला नाही. अनेकजण कोरोनातून मुक्त झाल्यानंतरही तत्काळ ड्युटीवर हजर आले आहेत. आता तर एक जूनपर्यंत कडक लाॅकडाऊन सुरू होत आहे. त्यामुळे सुट्टीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनाही बोलाविण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे सरतेशेवटी जिल्हा प्रशासनाला आणखी कडक लाॅकडाऊन करावा लागला. हा लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने कंबर कसली असून, जिल्ह्यातील ४६ ठिकाणी तपासणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. विशेषता पोलिसांनी सातारा शहरात येणारे रस्ते आणि जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर लक्ष केंद्रित केले आहे. या लाॅकडाऊनची अंमलबजावणी करावी यासाठी पोलिसांनी २६०० पोलिसांचा ताफा, होमगार्ड, स्ट्रायकिंग फोर्स अशा प्रकारची फौज बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरणार आहे. सातारा शहरांमध्ये एकूण नऊ ठिकाणी तपासणी केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यामध्ये मोळाचा ओढा, भूविकास बँक, वाडे फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट, शिवराज पेट्रोल पंप, पोवई नाका, समर्थ मंदिर, शाहूपुरी चौक, राजवाडा, आदी ठिकाणांचा समावेश आहे. या लाॅकडाऊनमध्ये सर्व अत्यावश्यक सेवाही बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे पोलीस शहरातून २४ तास गस्त घालणार आहेत. जेणेकरून अर्धे शटर उघडून कोणी नियमाचे उल्लंघन करत नाही ना, याची शहानिशाही पोलीस करणार आहेत.
चौकट:
पुन्हा फटके खाऊ नका!
गतवर्षी लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या लोकांना चांगलेच झोडपून काढले होते. मात्र, वरिष्ठांनी लाठीहल्ला करू नका असे सांगितल्यानंतर पोलिसांचे फटके कमी झाले. परंतु, आता दुसऱ्यांदा कडक लॉकडाऊन सुरू होत आहे. या लॉकडाऊनमध्येही विनाकारण बाहेर पडू नये, अन्यथा गतवर्षीसारखे पुन्हा फटके खावे लागतील. या लाॅकडाऊनचे सर्व सातारकरांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.