पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रातून २७ गावे वगळू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 03:32 PM2020-05-26T15:32:24+5:302020-05-26T15:36:11+5:30
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंवेदनशील क्षेत्रात २७ गावांना पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रातून वगळू नये, अशा मागणीचे पत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने मुख्यमंत्री कार्यालयास देण्यात येणार असल्याची माहिती क्रिएटिव्ह नेचर फे्रंडसचे रोहन भाटे यांनी दिली.
कऱ्हाड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंवेदनशील क्षेत्रात सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यातील ५५ गावांचा समावेश होतो. तर बफर क्षेत्रात याच जिह्यातील ८४ गावे समाविष्ट आहेत. या गावांमधील ११ गावांचा समावेश पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रातून वगळण्यासाठी प्रस्तावित केलेल्या ३८८ गावांमध्ये करण्यात आला आहे. मात्र, २७ गावांना पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रातून वगळू नये, अशा मागणीचे पत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने मुख्यमंत्री कार्यालयास देण्यात येणार असल्याची माहिती क्रिएटिव्ह नेचर फे्रंडसचे रोहन भाटे यांनी दिली.
भाटे यांनी दिलेल्या माहिनुसार, पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रामधून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २७ गावे वगळू नयेत, असे विनंतीपर पत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने मुख्यमंत्री कार्यालयास पाठविले जाणार आहे. या गावांमध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि राधानगरी अभयारण्याचे गाभा (कोअर) व झालर (बफर) क्षेत्र, तसेच तिल्लारी ते राधानगरी अभयारण्यादरम्यान असलेल्या वन्यजीव भ्रमणमार्गातील महत्त्वाच्या गावांचा समावेश आहे.
मागील आठवड्यात केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्राबाबत राज्य सरकारची बैठक पार पडली. या बैठकीत पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्रात समाविष्ट करण्यासाठी २०९२ गावांची अंतिम यादी प्रस्तावित करण्यात आली.
यामध्ये जुन्या यादीतील ३८८ गावे वगळून ३४७ नव्या गावांचा समावेश करण्यात आला. ही यादी गेल्या सरकाराच्या काळातच तयार करण्यात आली होती. मात्र, नव्या सरकारने त्यामध्ये छाननी न करता ती प्रस्तावित केली. वगळलेल्या ३८८ गावांमध्ये सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वन्यजीव भ्रमणमार्गाच्या (वाघ-हत्ती) अनुषंगाने महत्त्वाच्या गावांचा समावेश होता. शिवाय वगळलेल्या गावांमध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि राधानगरी अभयारण्याच्या गाभा व बफर क्षेत्रातील गावेदेखील होती.
या गावांचे महत्त्व अधोरेखित आहे. त्यावर अनेक शास्त्रीय अभ्यास व संशोधन झालेले आहे. नमूद केलेल्या गावांबाबतचे वास्तव सत्यापित करण्याची मागणी मुख्यमंत्री कार्यालयाकडे तसेच वनजीव विभागाकडे अनेक वन्यजीव अभासकांनी केली. सह्याद्री व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने पत्राद्वारे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २७ गावांचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करून त्यांना पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रातून न वगळण्याची विनंती केली असल्याची माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक सत्यजित गुजर यांनी दिली आहे.
यासंदर्भात राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, पश्चिम घाट संवदेनशील क्षेत्रातून वगळण्यासाठी प्रस्तावित केलेल्या ३८८ गावांमधील वन्यजीवांसंदर्भातील महत्त्वाच्या गावांची वास्तविकता तपासण्याचे आदेश आम्हाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळाले होते. त्यानुसार सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वन्यजीवांच्या अनुषंगाने महत्त्वाची असणाऱ्या गावांची यादी आम्ही मंगळवारी पाठवणार आहोत.